FSSAI : ग्राहकांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी, मिठाई दुकाने आणि इतर सर्व फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी स्टेपल पिन, मेटल वायर किंवा तत्सम धातूच्या वस्तू वापरण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
FSSAI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, काही खाद्य व्यवसायांकडून केक, मिठाईचे बॉक्स, स्नॅक पॅकेट्स, टेक-अवे फूड पार्सल्स आणि इतर खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी स्टेपल पिन किंवा मेटल वायरचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये अशा पिन्स खाद्यपदार्थांमध्ये किंवा पॅकिंगमध्ये आढळून आल्या असून त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
FSSAI च्या मते, पॅकिंगमध्ये वापरलेल्या स्टेपल पिन किंवा मेटल वायर चुकून अन्नासोबत गिळल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तोंड, घसा किंवा पचनसंस्थेला दुखापत होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंतही निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर ही बंदी लागू करण्यात आली आहे.
नियम मोडल्यास सक्त कारवाई
प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे पालन न करणाऱ्या खाद्य व्यवसायांवर Food Safety and Standards Act, 2006 आणि संबंधित नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे सर्व खाद्य व्यवसायांनी पर्यायी आणि सुरक्षित पॅकिंग पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, याच महिन्यात FSSAI ने खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. वृत्तपत्रांमधील शाई आणि रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात, असे प्राधिकरणाने म्हटले होते.
ग्राहकांची सुरक्षितता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत अधिक कठोर भूमिका घेत FSSAI कडून अलीकडच्या काळात सातत्याने अशा मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत. त्यामुळे आता खाद्य व्यवसायांना पॅकेजिंगच्या पद्धतींमध्ये बदल करणे अपरिहार्य ठरणार आहे.
हेही वाचा: Solapur : सोलापूरमध्ये भीषण दुर्घटना; पिकअप व्हॅन विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, बचावकार्याला वेग


