Solapur : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली पिकअप व्हॅन अचानक विहिरीत कोसळल्याने, 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अपघातग्रस्त व्हॅनमधून एकूण 14 जण प्रवास करत होते, त्यापैकी आतापर्यंत 7 जणांना वाचवण्यात यश आले असून, 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अचानक झालेल्या या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने बचावकार्य हाती घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पिकअप वाहनातून प्रवास करणारे सर्व नागरिक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवाशी होते. दरम्यान, देवदर्शनाहून परतत असताना हा अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज नोंदवला जात आहे. वेगाने आलेले वाहन थेट विहरीत कोसळले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीसांसह आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. विहिरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनीही बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला. ताज्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनातून 6 जणांना वाचवण्यात यश आले असून, अन्य नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क केला जात आहे.
या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, वाहनात किती प्रवासी होते आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : Crime : कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ महिला चोरांच्या टार्गेटवर; २४ तासांत चेन स्नॅचिंगच्या दोन घटना
Join Our WhatsApp Community

