पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बहुप्रतिक्षित युरोप दौऱ्याला फ्रान्समधील नीस येथून यशस्वी सुरुवात झाली आहे. प्रमुख जागतिक भागीदारांसोबत भारताचे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह ‘भारत इनोव्हेट्स’ (India Innovates) शिखर परिषदेचे संयुक्तपणे उद्घाटन केले.
या नवोन्मेष-केंद्रित कार्यक्रमात भारत, फ्रान्स आणि इतर देशांतील आघाडीचे स्टार्टअप्स, दिग्गज गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. शिखर परिषदेच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) निवडक गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल नेत्यांशी संवाद साधून भारतात गुंतवणुकीच्या नवीन संधींवर चर्चा केली.
‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत पंतप्रधानांनी या दौऱ्याबद्दल कमालीची उत्सुकता व्यक्त केली होती. परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि फ्रान्स यांच्यात एक विशेष भागीदारी आहे. सहभाग, दृढनिश्चय, नावीन्य, प्रेरणा आणि एक समान दृष्टीकोन हा या भागीदारीचा पाया आहे. भारताचे तरुण नवोन्मेषक (Innovators) आज अशा उपायांचा शोध घेत आहेत, ज्यामुळे केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण मानवजातीला फायदा होईल.
अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात मोठे बदल
पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) आपल्या भाषणात भारताने अलीकडच्या काळात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांवर प्रकाश टाकला. स्वच्छ ऊर्जा, प्रगत अणुभट्ट्या आणि अग्रगण्य संशोधनासारख्या क्षेत्रांत भारताने केलेल्या सुधारणा देशाला भविष्यातील तंत्रज्ञान आणि ऊर्जा उपायांमध्ये नवीन उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच तरुणांच्या ऊर्जेला वाव देण्यासाठी भारताने संरक्षण आणि अंतराळ क्षेत्र नवनिर्मितीसाठी खुले केले असून, आज शेकडो स्टार्टअप्स या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ड्रोन दीदी’ ते स्टार्टअप संस्थापकांपर्यंत महिला शक्तीचा डंका
भारतात तळागाळातील महिलांमध्ये होत असलेल्या बदलांचा उल्लेख करताना पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, आज देशात ‘ड्रोन दीदी’ पासून ते थेट स्टार्टअपच्या यशस्वी संस्थापकांपर्यंत, महिला शक्ती यशाच्या नवनवीन कथा लिहित आहे. नवोन्मेषाचे मोठेपण केवळ त्याच्या आर्थिक मूल्यांकनाने (Valuation) मोजले जात नाही, तर मानवी जीवनावरील त्याच्या सकारात्मक प्रभावाने मोजले जाते. हीच ‘भारत इनोव्हेट्स’ची भावना आणि भारताची दूरदृष्टी आहे,” असे सांगत पंतप्रधानांनी स्टार्टअप उद्योजकांना प्रोत्साहित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या या फ्रान्स दौऱ्यात नीस व्यतिरिक्त एव्ियन आणि पॅरिसमधील अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे. फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या युरोप दौऱ्याच्या पुढील टप्प्यासाठी स्लोव्हाकियाकडे रवाना होतील. या दौऱ्यामुळे भारत आणि युरोपीय देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्याला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community

