- कल्याण : प्रतिनिधी
कल्याण (kalyan) पश्चिमेतील गणपती चौक ते डीपी चौक या रस्त्यावरील निसर्ग सौंदर्यात भर घालणाऱ्या सात ते आठ टेबेबुईया झाडांच्या मुळावरच घाव घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तींनी या झाडांच्या खोडांना ड्रिल मशीनने छिद्रे पाडून त्यात विषारी द्रव्य सोडल्याने ही झाडे मृत्यूच्या दाढेत उभी आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) घटनेचा पंचनामा करून अज्ञातांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या टेबेबुईया झाडांच्या खोडाला छिद्रे दिसली. जवळ जाऊन पाहिल्यावर छिद्रांमध्ये इंजेक्शनसारखे द्रव्य टाकल्याचे आणि झाडाच्या सालीतून पांढरा द्रव बाहेर येत असल्याचे लक्षात आले. काही झाडांची पानेही पिवळी पडून गळू लागली आहेत. नागरिकांनी तातडीने याची माहिती केडीएमसीच्या उद्यान विभागाला दिली.
(हेही वाचा – Raigad : स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर आक्रमक; विशेष मोहीम राबवण्याची मागणी)
केडीएमसीकडून ऑन द स्पॉट पंचनामा
या प्रकाराची माहिती मिळताच केडीएमसीच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान सात ते आठ झाडांच्या खोडाला जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवर दोन ते तीन ठिकाणी ड्रिल केल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून पुरावे गोळा केले. झाडे तोडता येत नसल्याने ती मुद्दाम मारण्याचा हा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल होणार
या संतापजनक प्रकारानंतर केडीएमसी प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. महाराष्ट्र वृक्ष संरक्षण अधिनियम १९७५ नुसार अज्ञात व्यक्तींविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच छिद्रांमध्ये टाकलेल्या द्रव्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जाणार आहे.
चेरी ब्लॉसमवरच घाला
कल्याण-डोंबिवलीला मुंबईचा चेरी ब्लॉसम म्हणून ओळख मिळवून देणारी टेबेबुईया झाडे खास आकर्षण आहेत. उन्हाळ्यात गुलाबी, पिवळ्या फुलांनी बहरलेला हा रस्ता पाहण्यासाठी हजारो नागरिक येतात. अशा झाडांवरच घाव घातल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे रस्ता रूंदीकरणासाठी की व्यावसायिक हेतूने हा प्रकार घडला ? याचा तपास करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे असे प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने केडीएमसीच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

