Kalyan Court मध्ये पार्किंगवरून वाद: पोलिसाकडून वकिलाला मारहाण; कारवाईचे आदेश

87
Kalyan Court मध्ये पार्किंगवरून वाद: पोलिसाकडून वकिलाला मारहाण; कारवाईचे आदेश
Kalyan Court मध्ये पार्किंगवरून वाद: पोलिसाकडून वकिलाला मारहाण; कारवाईचे आदेश
  • कल्याण : प्रतिनिधी

न्यायदानाच्या मंदिरातच कायद्याच्या रक्षकाने वकिलावर हात उचलल्याची संतापजनक घटना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात घडली आहे. पार्किंगच्या किरकोळ वादातून बंदोबस्तावरील एका पोलिस कर्मचाऱ्याने वकिलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून त्यामुळे वकील वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा न्यायाधीशांनी संबंधित पोलिसावर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी कल्याण न्यायालयाच्या (Kalyan Court) आवारात वाहन पार्क करण्यावरून ॲड. प्रक्षित अडांगळे आणि तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले. वाद टोकाला गेल्यावर पोलिस कर्मचाऱ्याने अचानक वकिलाच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. आजूबाजूला उपस्थित असलेल्या इतर वकिलांनी आणि पक्षकारांनी तातडीने मध्यस्थी करून वाद सोडविला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal: राज्यात १ महिना पुरेल एवढाच इंधन साठा, अन्न व नागरी पुरवठामंत्री म्हणाले…)

न्यायालयातच सुरक्षा नाही – वकिलांचा आक्रोश

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच कल्याण बार असोसिएशनचे शेकडो वकील न्यायालय आवारात जमा झाले. न्यायाच्या मंदिरातच जर वकिलांवर हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय ? पोलिसांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशा तीव्र भावना उपस्थित वकिलांनी व्यक्त केल्या. दोषी पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्याची मागणी वकील संघटनेने लावून धरली आहे. न्यायालयाच्या आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने असुरक्षिततेची भावना वकील मंडळींनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली.

जिल्हा न्यायाधीशांकडून तत्काळ दखल

या घटनेमुळे न्यायालयाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे लक्षात येताच जिल्हा न्यायाधीश परबीन सय्यद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी कल्याण पोलिस प्रशासनाला तातडीने निर्देश दिले. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करावा आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे आदेश

पोलिस तपासाच्या कचाट्यात

जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानंतर स्थानिक महात्मा फुले चौक पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. व्हायरल व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींचे जबाबांच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केली असून आरोपी कर्मचाऱ्यावर खातेनिहाय कारवाई होण्याची शक्यता आहे. कल्याण न्यायालय (Kalyan Court) परिसरात वाहनतळाची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी आणि पोलिस यांच्यात वारंवार खटके उडतात. मात्र, या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत होण्याची ही पहिलीच गंभीर घटना असल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.