Crime news : ईस्टर्न एक्सप्रेस (Eastern Express) हायवेवरील आनंद नगर-मुलुंड चेक नाक्यावर नाकाबंदीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ८ किलो गांजासह रंगेहात पकडलेल्या अमली पदार्थ (Drugs) तस्कराला पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी, घटनास्थळावरूनच तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाल्याने खात्यात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी कर्तव्यात कसूर आणि लाचखोरीच्या आरोपाखाली ६ पोलीस कॉन्स्टेबलना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व उपनगरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेले हे सहा हवालदार या महिन्याच्या सुरुवातीला आनंद नगर-मुलुंड चेक नाक्यावर गस्तीवर होते. दरम्यान, त्यांनी कल्याणहून सायनच्या दिशेने जाणारी एक संशयास्पद टॅक्सी अडवली. या टॅक्सीची झडती घेतली असता, आरोपीच्या ताब्यातून तब्बल ८ किलो गांजा जप्त करण्यात आला. (Crime news)
(हेही वाचा – Aishwarya Rai Cannes 2026: कान्समध्ये भारतीय फॅशनची क्वीन अजून का पोहोचली नाही? ऐश्वर्या रायच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट)
आरोपीला गांजासह पकडल्यानंतर त्याला तात्काळ पोलीस ठाण्यात नेणे गरजेचे होते. मात्र, संबंधित कॉन्स्टेबल्सनी तसे न करता, त्याला नाक्यावरच बराच वेळ ताटकळत ठेवले. यादरम्यान पोलिसांकडून निष्काळजीपणा तर झालाच, शिवाय यामागे लाचखोरीचाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या याच सुस्त कारभाराचा आणि दिरंगाईचा फायदा घेत आरोपीने तिथून पळ काढला. (Crime news)
“पोलीस हवालदार यांच्याकडून निष्काळजीपणा झाला होता. तसेच या प्रकरणात लाचखोरी झाल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे,” अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. तसेच तस्कर पळून गेल्यानंतर घाबरलेल्या हवालदारांनी जप्त केलेला गांजा पोलीस ठाण्यात आणून जमा केला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून सहाही जणांना निलंबित केले. यानंतर नवघर पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक तात्काळ तस्कराच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे कल्याणमधून (kalyan) पळून गेलेल्या मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. (Crime news)
सध्या आरोपीविरुद्ध नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आम्ही आता या अमली पदार्थ तस्करीमागील मोठ्या पुरवठा साखळीचा (सप्लाय चेन) तपास करत आहोत. आमच्या हाती काही महत्त्वाचे फोन नंबर आणि धागेदोरे लागले आहेत,” असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Crime news)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

