Asha Bhosle : सूर हरपला, सुगंध उरला!

98
Asha Bhosle : सूर हरपला, सुगंध उरला!
  • नमिता वारणकर

Asha Bhosle                 विश्वविख्यात पार्श्वगायिका आशा भोसले… अर्थात जगभरातील रसिकांच्या लाडक्या ‘आशाताई’! त्यांच्या नावाच्या या चार शब्दांतच अगाध व्यापकत्व दडलेलं असलं तरीही अत्यंत साधेपणाही आहे. विविधांगी भावभावनांचं मिश्रण आपल्या कंठातून झंकारत रसिकांच्या ह्रदयात आपल्या आवाजाचं चांदणं अलगद पसरवत लहान-मोठ्या प्रत्येकालाच आयुष्यभर आपलंसं करणाऱ्या… ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागते… एवढे मी भोगीले की मज हसावे लागले…!’ या त्यांनीच गायलेल्या गाण्याप्रमाणे स्वत:चंही आयुष्य सर्वार्थाने जगणाऱ्या आशाताई लौकिकार्थाने रविवारी (१२ एप्रिल) अनंतात विलीन झाल्या. मात्र त्यांनी पसरवलेल्या सुगंधी स्वरांच्या कुपीचा अक्षय ठेवा त्या आपल्या सगळ्यांसाठी मागे ठेवून गेल्या आहेत. (Asha Bhosle)

आशाताईंना, प्रत्येक रसिकांनी आयुष्यभर वेगवेगळ्या माध्यमांतून ऐकलं. कधी आकाशावाणीवर, कधी दूरदर्शनवर, कधी विविध वाहिन्यांवर मुलाखतींमध्ये त्यांचे संगीतकार, गीतकारांबरोबरचे किस्से ऐकले. एखाद्या कॉन्सर्टमध्येही त्या लाईव्ह गाताना दिसायच्या. आजची ‘जेनझी’ भ्रमणध्वनीमधून त्यांच्या विविध गाण्यांचा आवर्जून आनंद घेत असते. वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा उत्साही उत्फुल्ल आशाताई. त्यांची सुरांवरील ओजस्वी पकड, चेहऱ्यावर सदैव स्मित, जुन्या-नव्या पिढीशी सर्वांगाने सूर जुळवणारी ही स्वरसम्राज्ञी आता सुरेल, सुमधुर गाणी आणि ह्रद्य, स्फूर्तीदायी आठवणींच्या रुपाने असंख्य रसिकांच्या ह्रदयात उमटलेल्या स्वरांच्या रूपाने कायमच जिवंत राहील, यात शंका नाही. (Asha Bhosle)

(हेही वाचा – Sonia Gandhi यांचे नाव १९८०च्या मतदारयादीत कसे ?; दिल्लीतील विशेष न्यायालय आता मागचे सगळेच काढणार)

२० भाषा आणि १२ हजारांहून अधिक गाणी

गीतकारांचे शब्द आणि संगीतकारांच्या रचना आपल्या जादुई आवाजाने जिवंत करून रसिकांचे भावविश्व त्यांनी समृद्ध केले. जवळपास ८ दशकांच्या कारकीर्दीत आशा भोसले यांनी चित्रपटगीतं, नाट्यगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, लोकगीतं, लावणी, शास्त्रीय इतकंच काय तर पॉप, कॅबरे, कव्वाली, रविंद्र संगीत असे संगीताचे अनेक प्रकार लिलया पेलले आणि २० वेगवेगळ्या भाषा, १२ हजारांहून जास्त गाणी गायली. (Asha Bhosle)

पुरस्कारांचा बहुमान 

२ वेळा ‘राष्ट्रीय पुरस्कार’, तब्बल १८ वेळा राज्य पुरस्कार, ‘जीवन गौरव’ पुरस्कारासह ९ वेळा ‘फिल्म फेअर पुरस्कार, ‘दादासाहेब फाळके सन्मान’, ‘पद्मविभूषण’ हा नागरी सन्मान आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’तर्फे ‘मोस्ट रेकॉर्डेड आर्टिस्ट इन म्युझिक हिस्ट्री’ हा बहुमान त्यांना मिळाला. यापलीकडे माधुर्य, आर्तता, संवेदनशीलता, विरह असं भावनांचं विविधरंगी मिश्रण असलेली मधाळ आणि दिव्य स्वरांची संगत लाभलेल्या त्यांच्या वैविध्यपूर्ण संगीताच्या मुशाफिरीला अखेरपर्यंत मिळालेली रसिकांची भरभरून दाद ही कुणाही कलाकाराला हवीहवीशी वाटणारीच गोष्ट! ती त्यांना यानंतरही मिळत राहीलच आणि रसिकांच्या ह्रदयाचा आजन्म ठाव घेत राहील. (Asha Bhosle)

(हेही वाचा – Nashik Conversion Case : आरोपींवर लावला अ‍ॅट्रॉसिटी; इतर अधिकाऱ्यांचाही सहभाग उघड ?)

स्वतंत्र शैली

आशाताईंच्या गळ्यातून आलेल्या चमकदार ताना, गळ्यातल्या हरकती, मुरक्या, अतिशय भावपूर्ण गायन, कलेवर वाखाणण्याजोगी निष्ठा, यासाठी केलेलं भरपूर वाचन आणि संगीतासाठी आवश्यक असलेला अतिशय कठीण काळातही भरपूर रियाज करून बहिणीच्या दिव्य आवाजापुढे त्यांचा आवाज टिकून राहावा यासाठी त्यांनी स्वत:च्या गायनाची वैशिष्ट्यपूर्ण शैली निर्माण केली. जी ‘भारतरत्न लता मंगेशकर’ यांच्यापेक्षाही अतिशय वेगळी असून रसिकांना अत्यंत भावली. पूर्वीच्या काळी ‘लाईव्ह रेकॉर्डिंग’ व्हायचं. दिग्गज वादकांच्या समुहासोबत उभं राहून पहिल्या टेकमध्येच भावपूर्णतेनं गाणं अशा पद्धतीने शेकडो गाणी त्यांनी गायली आणि लोकप्रियही झाली. पंडित ह्रदयनाथ यांनी ‘धर्मकन्या’ या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘नंदलाला रे… नटून सजून आले… पायात पैंजण बांधून आले…!’ ‘माझीया मना जरा थांब ना…’, ‘ऋतु हिरवा’ या गीतसंग्रहातली गाणी, ‘राजहंस सांगतो…’, ‘आज चांदणे उन्हात हसले…’, ‘शूरा मी वंदिले..’,‘देव जरी मज कधी भेटला…’ यासह ‘चुरा लिया है तुमने जो दिल को…’, ‘पिया तू अब तो आजा…’, ‘दिल चिज क्या है…’, ‘आओ हुजूर तुमको…’ अशी मराठी-हिंदी चित्रपटांतली अनेकानेक सदाबहार गाणी किती किती सांगावीत…! सर्वच रसिकांच्या मनाशी संवाद साधतात. आशाताईंच्या तेजस्वी स्वरांना तोड नाही. (Asha Bhosle)

ज्येष्ठ कवी प्रविण दवणे, ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, ‘माणिक एंटरटेनमेंटचे’चे अतुल दाते, गायक मिलिंद इंगळे, नंदेश उपम, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर, पद्मजा फेणाणी अशा अनेकानेक दिग्गज कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनीही संगीतातल्या या झंझावाताविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘उरले उरात काही आवाज चांदण्यांचे…’ हीच भावना समस्त रसिकांच्या मनात आहे. (Asha Bhosle)

जीवनातल्या आव्हानांना सामोरे जात कलेची प्रेरणादायी उपासना करणाऱ्या, लढवय्या, अनेक मनांना तजेला आणि दिलासा देणाऱ्या, आपलं भावमधुर जीवनगाणं रसिकांच्या ह्रदयात अनंत काळ जिवंत ठेवणाऱ्या, सतत वर्तमानकाळात जगणाऱ्या, स्वरांचा प्रवास अमर करणाऱ्या, चैतन्यमूर्ती, स्वरनिष्ठ, रसिकांचं भावविश्व समृद्ध करणारा त्यांचा आवाज दररोज प्रत्येक घराघरांत गुंजणारा… आशाताईंच्या गुणवैशिष्ट्यांचा हा परीघ वाढतच जाणारा आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सांगितिक कारकिर्दीचा आढावा घेण्यासाठी या लेखाद्वारे केलेला हा इवलासा प्रयत्न होता. भारतीय संगीताला लाभलेल्या या महान ‘विभूती’ला ‘हिंदुस्थान पोस्ट’कडून अक्षय्य नमन! (Asha Bhosle)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.