Asha Bhosle “तीन दिवसांपूर्वी माझं आशाताईबरोबर बोलणं झालं. त्यांना म्हटलं, काय म्हणताय? त्या म्हणाल्या, “काय म्हणणार आता ९३ आलं? आता जायचं! आता काय भरभरून बोलण्याचे दिवस आहेत का? आपल्या ज्या काही मुलाखती आहेत त्या तुझ्याकडे रेकॉर्ड केलेल्या आहेत ना? मग त्या मला एक-दोन दिवसांत ताबडतोब ऐकायला आणून देशील का?, आता प्रत्येक दिवसच मला महत्त्वाचा आहे.” अशा शब्दांमध्ये आशाताईबरोबर शेवटचा संवाद झाला होता, असे ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ (Senior interviewer Sudhir Gadgil ) यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आशा भोसले यांच्याबरोबरील प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
माझं घरातलंच कोणीतरी गेलं
यावेळी सुधीर गाडगीळ म्हणाले की, आज आशाताईंचे निधन झाले. मला माझ्या घरातलंच कोणीतरी गेले आहे, अशी माझी भावना आहे. मी त्यांच्याशी १९७८ पासून गप्पा मारतोय. देशातील विविध शहरांसह परदेशातील सुमारे २२ सविस्तर मुलाखती मी त्यांच्या घेतल्या आहेत. तसेच वर्तमानपत्रांकरता वेगळ्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्याशी बोलत असताना एक आपुलकी, आत्मीयता होती. मी हे कधीच विसरणे शक्य नाही. नेहमीच असेच वाटले की, आपण घरातील माणसांबरोबरच बोलतोय.
खाणं आणि गाणं हे आशाताईंचे आवडीचे विषय
१९७८ मध्ये मी प्रथम आशाताईबरोबर सविस्तर बोललो. सर्वात प्रसिद्ध गायिकांपैकी एक असणाऱ्या आशाताईबरोबर प्रथम कसं बोलायचं, असा प्रश्न होता; पण त्या अत्यंत आपुलकीने म्हणाल्या, चल आपण गप्पा मारूया. त्यामुळे त्यांची सविस्तर मुलाखत घेणे अगदी सोपे झाले. त्या गाणं मस्त गुणगुणायच्या. खाणं आणि गाणं हे दोन आवडीचे विषय होते, असेही गाडगीळ यांनी सांगितले.
आशाताईंचं मला जाणवलेलं वेगळेपण म्हणजे त्या स्वतःला श्रेष्ठ समजत नव्हत्या. एखाद्या घरातल्या माणसाशी बोलते-असं माझ्याशी बोलायच्या. गाणी तर खूप गुणगुणायच्या आणि मला म्हणायच्या, ‘अरे हे गाणं आठवतंय का?’ म्हणजे त्यांचंच गाणं त्या आठवणीकरता मला विचारायच्या. त्यांना खात्री होती की मला माहीत असेल. ‘तुला आवडतं कुठलं माझं गाणं?’ म्हटलं, असं कसं सांगणार? तुमची सगळीच गाणी मला आवडणारी आहेत. तरी म्हणे… तर म्हटलं, “कारे दुरावा, कारे अबोला, अपराध माझा असा काय झाला”, असे गाणे म्हणतच त्या आठवणी सांगायच्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

