Dombivli : माणूसच उठला झाडांच्या मुळावर; हिरव्या सावरीवर कुऱ्हाडीचे घाव

बहूपयोगी झाडाच्या खांडोळीची थेट आयुक्तांकडे तक्रार

244
Man cutting down a tree in Dombivli's Milapanagar area.
Dombivli : माणूसच उठला झाडांच्या मुळावर; हिरव्या सावरीवर कुऱ्हाडीचे घाव
  • कल्याण, प्रतिनिधी

डोंबिवली एमआयडीसीचा मिलापनगर परिसर हा विविध वृक्षराजीने बहरलेला आहे. या वृक्षवल्लीमुळे परिसरात आल्यावर एक प्रकारचा पर्यावरणीय आनंद सर्वांना अनुभवायला मिळतो. एकीकडे विविध वृक्षांनी नटलेल्या या परिसरातील हिरव्या सावरीवर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची खांडोळी केल्याचे आढळून येताच परिसरातील रहिवाशांचा, विशेषतः निसर्गप्रेमींच्या संतापाचा कडेलोट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे निसर्गद्वेष्ट्यांनी केलेल्या कृत्याची तक्रार थेट कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे. (Dombivli)

निवासी विभागामध्ये सद्या गटारे-नाले आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे चालू आहेत. त्यामुळे काही झाडांना इजा होऊन ती पडतात किंवा सुकून मरून जात आहेत. काही रहिवाशांना आता ही मोठी झालेली झाडे नकोशी झाली आहेत. त्यापासून विविध अडचणी आल्याने अशा निसर्गद्वेष्ट्यांना ही झाडे पूर्णपणे तोडून हवी आहेत. त्यासाठी कायदेशीर मार्गाने न जाता झाडे तोडणाऱ्यांना कंत्राट देऊन ही झाडे तोडली जात आहेत. मिलापनगरमध्ये आर एल – १३० आणि आर एल – १३१ या भूखंडादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेले हिरवी सावर जातीचे बहूपयोगी मोठे झाड सोमवारी अचानक माणसे आणून तोडण्यात आले. कुणाला कसलाही व्यत्यय वा अडथळा नसलेले हे झाड तोडल्यामुळे वृक्षप्रेमी हळहळले. (Dombivli)

(हेही वाचा – Serena Williams व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करणार? ITIA ने काय घेतला निर्णय?)

मिलापनगरमधील एक वृक्षप्रेमी/ज्येष्ठ नागरिक मुकुंद वैद्य यांनी हे झाड बेकायदेशीररित्या तोडण्यास हरकत घेतली. तेव्हा झाड तोडण्यास सांगणाऱ्या त्या रहिवाशाने वैद्य यांना विरोध केला. हिरव्यागार सावरीच्या फांद्या छाटाव्यात असे सांगून जर पूर्ण झाड तोडायचे असेल तर प्रशासनाकडून रितसर परवानगी घ्या, असा मुकुंद वैद्य यांनी सल्ला दिला. परंतु त्या रहिवाशाच्या हट्टापायी हिरवी सावर जातीचे बहुउपयोगी झाड पूर्ण तोडले गेले. या प्रकारामुळे व्यथित होऊन वृक्षप्रेमी मुकुंद वैद्य यांनी छायाचित्रांसह तक्रार केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे इ-मेलद्वारे केली आहे. या तक्रारीची प्रत वैद्य यांनी मिलापनगर रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशनला दिली आहे. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यावर काय कार्यवाही करतात? याकडे तक्रारदार मुकुंद वैद्य यांच्यासह परिसरातील रहिवासी, मिलापनगर रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशन आणि पर्यावरणवाद्यांसह वृक्षप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. (Dombivli)

माणूसच उठला मुळावर…

जीवघेण्या प्रदूषण समस्येवर उपायोजना म्हणून ऑक्सिजन देणारी झाडे या भागातील रहिवाशांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लावली आहेत. वड, पिंपळ, बदाम, आंबा, नागकेसर, शिसम, चेरी, पेरू, उंबर, फणस, बहावा, करंज, कडूनिंब, बकुळ, चिंच, आदी विविध प्रकारच्या या झाडांनी आता महाकाय वृक्षांचे स्वरूप धारण केले आहे. याच एमआयडीसीच्या निवासी विभागात पोपट, साळुंक्या, चिमण्या, भारद्वाज, लवबर्ड, इत्यादी अनेक प्रकारच्या पक्षांचे अस्तित्व दिसून येते. ऑक्सिजन अर्थात प्राणवायूची निर्मिती करून प्रदूषण रोखण्यास मदत करणारी लहान-मोठ्या वृक्षांनी बहरलेली डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील वृक्षवल्ली आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. काही बेजबाबदारांकडून वृक्षवल्लीला धोका निर्माण झाला आहे. झाडांखाली कचरा जाळला जात असल्याने आगीची झळ पोहोचून अनेक झाडे मरणासन्न अवस्थेत आढळून येत असतानाच आता तर माणूसच या निसर्गसंपदेच्या मुळावर उठल्याने पर्यावरणवाद्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.