कोविड विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर यासाठी राबवण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आजवर महापालिका प्रशासनाने किती कोटी रुपये खर्च केले, याची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी भाजपाने केली आहे. तर विरोधी पक्षानेही कोविडच्या खर्चाचे ऑडीट करुन त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता मावळल्यानंतर आणि रुग्णांची संख्या घटल्यानंतर आता यावरील खर्चावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजपाने केली मागणी
महापालिकेच्या स्थायी समितीपुढे के-पूर्व विभागातील सेव्हन हिल्स रुग्णालयाचे सुमारे १० कोटींचे दोन प्रस्ताव आणि वांद्रे पूर्व येथील बीकेसी कोविड सेंटरमधील कामांच्या खर्चाचे सुमारे १३० कोटींचे दोन प्रस्ताव आले होते. यावर बोलताना, भाजपाचे नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी यापूर्वी २१०० कोटी रुपये आणि त्यानंतर ४०० कोटी रुपयांचा निधी स्थानांतर करण्यात आला असल्याचे सांगितले. परंतु आता तिसरी लाट काही दिवस तरी येणे शक्य नाही. त्यामुळे किमान आजवर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी केली. पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत जो काही खर्च केला आहे याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली.
(हेही वाचाः मराठी कंत्राटदाराचा प्रस्ताव मागे: आक्रमक भाजपाला अध्यक्षांचा ‘हा’ सवाल)
विरोधी पक्षनेत्यांची मागणी
कोविडच्या काळात दहा रुपयांची वस्तू शंभर रुपयांना विकत घेतली गेली. त्यामुळे या सर्व खर्चांचे ऑडीट होणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे, यामध्ये दुमत नाही. परंतु यावर जो खर्च झाला आहे त्याचे ऑडीट करणे गरजेचे असून, एका महिन्यात महापालिका लेखापरिक्षकांनी याचा अहवाल सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.
कोविड कामांमध्ये भ्रष्टाचार झाला का हे जनतेला कळूदे
स्थायी समिती जे आदेश देतात ते प्रत्यक्षात उतरतात का, हे पाहण्याची गरज असल्याचे सांगत भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी जे प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवले, त्यावर विस्तृत अहवाल आलेलेच नाही. त्यामुळे कोविड कामांमध्ये भ्रष्टाचार झाला का, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. यामध्ये स्थायी समितीही संशयाच्या फेऱ्यात अडकली असून कोविड गेला, पण आता अपहार झाला हे समजू द्या. त्यामुळे याला जबाबदार कोण, असा सवाल करत याची चिरफाड होणार की नाही, असाही सवाल केला. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार तसेच सूचनांनुसार याचा अहवाल आणि विस्तृत माहिती समितीच्या पटलावर सादर करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.
(हेही वाचाः शिवसेना म्हणतेय, भाजपाचे १५-२० नगरसेवक संपर्कात)
Join Our WhatsApp Community