मराठी कंत्राटदाराचा प्रस्ताव मागे: आक्रमक भाजपाला अध्यक्षांचा ‘हा’ सवाल

त्यावेळी मराठी माणूस, मराठी कंत्राटदार न आठवलेल्या भाजपाला आताच का मराठी कंत्राटदाराची ओळख पटली.

122

मागील काही दिवसांपासून मराठीच्या मुद्द्यावरुन भाजपा आक्रमक झालेली दिसून येत असून, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मराठी कंत्राटदारावरुन त्यांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला. दादरमधील कासारवाडी आणि प्रभादेवी येथील सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकास कामांमध्ये पात्र ठरलेल्या बी.जी.शिर्के यांचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेण्याची विनंती केली.

या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली, परंतु भाजपाने याला जोरदार विरोध करत याची ठोस कारणे दिल्याशिवाय हा प्रस्ताव मंजूर करण्यात येऊ नये अशी बाजू मांडली. परंतु यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव सर्वांच्या मंजुरीने फेरविचारासाठी पाठवण्यात आला होता. तेव्हा भाजपाचे मराठी प्रेम कुठे गेले होते, असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

(हेही वाचाः प्रकल्पबाधित कुटुंबाला घरांऐवजी मिळणार ५० लाखांपर्यंतची रक्कम)

लावली कमी दराने बोली

मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेंतर्गत करण्यात येत असून, दादर कासारवाडी आणि प्रभादेवीतील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी मेसर्स बी.जी. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली होती. आजवर मंजूर झालेल्या सर्व प्रस्तावांमध्ये इतर सर्व कंपन्यांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा जास्त दराची बोली लाऊन काम मिळवले होते. परंतु या कामांमध्ये मराठी कंत्राटदार असलेल्या या कंपनीने अंदाजित दरापेक्षा २१ टक्के कमी दर लावला होता. मात्र, हा प्रस्ताव जुलै २०२१ रोजी फेरविचारासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर हाच प्रस्ताव प्रशासनाने मागे घेण्यासाठी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता.

भाजपा नगरसेवकांनी केला विरोध

हा प्रस्ताव मंजुरीला आला असता, भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारणे देण्यात आलेली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यापूर्वी ज्या कंपन्यांची आर्थिक क्षमता नव्हती त्यांना क्षमतेपेक्षा अधिक काम देण्याचे प्रस्ताव याच समितीने मंजूर केले. मग कमी बोली लावणाऱ्या मराठी कंत्राटदाराचा हा प्रस्ताव कोणत्या कारणांसाठी मागे घेतो? सफाई कामगारांना घरे देताना असा भेदभाव का? जर मागे घ्यायचा होता तर आणला कशाला होता, असा सवाल करत मागे घेण्याच्या या प्रस्तावाला आपला विरोध असल्याचे सांगितले. तर भाजपाचे नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी प्रशासनाने कोणत्या राजकीय दबावाखाली हा निर्णय घेतला आहे, असा सवाल करत एकमेव मराठी कंत्राटदार होता, त्यामुळे याचे संयुक्तिक तांत्रिक कारण द्यावे असे सांगितले.

(हेही वाचाः होय, मी सफाई कामगाराचा मुलगा! असे का म्हणाले यशवंत जाधव?)

मराठी कंत्राटदारांचा आताच पुळका का?- जाधव

प्रशासनातील अधिकारी सांगतात आमच्यावर दबाव आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर करत प्रशासनाला हा प्रस्ताव मागे घेण्यास परवानगी दिली. मात्र, याला भाजपाच्या सर्व सदस्यांनी विरोध केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना जाधव यांनी हाच प्रस्ताव जुलै महिन्यात फेरविचारासाठी पाठवण्यात आला होता. सर्वानुमते हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवला होता. त्यावेळी मराठी माणूस, मराठी कंत्राटदार न आठवलेल्या भाजपाला आताच का मराठी कंत्राटदाराची ओळख पटली. आताच का त्यांना पुळका आला, असा सवाल करत भाजपाचा हा ढोंगीपणा असल्याचे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.