Kalyan Crime : डिलिव्हरी बॉयवर हल्ल्याची पुनरावृत्ती; कोळसेवाडी पोलिसांकडून त्रिकुटाचा शोध सुरू

128
Mumbai Crime
Mumbai Crime
  • कल्याण, प्रतिनिधी

मोबाईलद्वारे शूटिंग केल्याच्या वादातून कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागातील एका डिलिव्हरी बाॅयला त्याच परिसरातील तीन तरुणांनी जीवघेणी मारहाण केली. या डिलिव्हरी बाॅयच्या नाकावर बांबूचा फटका बसल्याने त्याच्या नाकाचे हाड तुटले आहे. या तरुणाला श्वासोच्छावासाचा त्रास सुरू झाला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोर त्रिकुटाचा शोध सुरू केला आहे. अशीच घटना काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एका हाय प्रोफाईल सोसायटीत घडली होती. इंद्रजित रवींद्रसिंह संधू (१९) असे जीवघेणी मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो खडेगोळवली परिसरात असलेल्या गजानन आयकाॅन इमारतीत कुटुंबीयांसह राहतो. सोमवारी रात्री सव्वादोन वाजण्याच्या दरम्यान खडेगोळवली भागातील मानवता रुग्णालयाजवळील डाॅमिनोज पिझ्झाजवळ ही घटना घडली. (Kalyan Crime)

कार्तिक कांबळे, प्रशांत नाईक आणि सुमित आत्राम अशी मारहाण करणाऱ्या फरार टोळक्याचे नाव असून ते याच भागातील रहिवासी असल्याचा तक्रारदार इंद्रजित संधू याचा संशय आहे. एका ग्राहकांच्या वस्तू विक्री करून परत आल्यावर इंद्रजित संधू आपल्या सहकाऱ्यांसमवेत सोमवारी रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास डाॅमिनोज पिझ्झामध्ये जात होते. त्यावेळी या दुकानाजवळ तीन तरुण थांबले होते. ते त्यांच्या कामासाठी थांबले असावेत म्हणून त्यांच्याकडे न पाहता इंद्रजित संधू त्यांच्या सहकाऱ्यांसह दुकानात जाऊ लागले. इतक्यात तेथे थांबलेल्या प्रशांत नाईक, कार्तिक कांबळे आणि सुमित आत्राम यांनी संधू आणि त्यांच्या मित्रांचे मोबाईलमधून शूटिंग सुरू केले. इंद्रजितने जाब विचारला असता त्यातील प्रशांत नामक तरुणाने तू मला विचारणारा कोण ? असा सवाल करत इंद्रजितशी हुज्जत घातली. (Kalyan Crime)

(हेही वाचा – US immigration policy :   स्थलांतरितांना मोठा धक्का; नव्या नियमाची अंमलबजावणी, कुणाला द्यावे लागणार हजार डॉलर्स?)

संतापलेल्या प्रशांत नाईकने इंद्रजितला शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. इंद्रजितच्या बचावासाठी त्याचे मित्र साहिल आणि हर्षल पुढे आले. हर्षलच्या हातात कुत्र्यांना हाकलण्याच्या बांबूने इंद्रजीतवर हल्ला चढविला. प्रशांतने बांबूची उपट इंद्रजित संधूच्या नाकावर घातली. यात नाकाचे हाड तुटून नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. हल्ल्यानंतर त्रिकुटाने तेथून पळ काढला. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यावर इंद्रजितच्या नाकाचे हाड तुटल्याचे स्पष्ट झाले. इंद्रजितचा एक दात या मारहाणीत तुटला आहे. दोन दातांना इजा झाली आहे. इंद्रजितला श्वास घेण्यास त्रास होत आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक वाय. एम. धोंगडे आणि त्यांचे सहकारी फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. (Kalyan Crime)

हायप्रोफाईल सोसायटीत डिलिव्हरी बॉयला बदडले

कल्याण पूर्वेतील रितेश अंपायर नामक हायप्रोफाईल सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मद्याच्या नशेत असलेल्या तिघांनी मिळून एका डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रितेश अंपायर सोसायटीमध्ये तीन तरुण नेहमी डिलिव्हरी बॉयना मुद्दाम अडवून त्रास देत असतात. एक बॉय या सोसायटीमध्ये डॉमिनोजमधून पिझ्झाची ऑर्डर डिलिव्हरीसाठी घेऊन आला असता सोसायटीतील तिघांनी किरकोळ कारणावरून वाद घालत अचानक त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीचा संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे तिन्ही तरुण मद्याच्या नशेत असल्याची माहिती हल्ल्यात जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयने पोलिसांना दिली. मात्र या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्येही संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Kalyan Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.