-
ऋजुता लुकतुके
एकीकडे पाक क्रिकेट मंडळ आशिया चषकातील पाकिस्तान संघाच्या कामगिरीचं कौतुक केल्याचं दाखवत असलं आणि खेळाडूंना त्यांनी इनाम जाहीर केलं असलं, तरी आतल्या गोटातून अशी बातमी आहे की, भारताविरुद्धचे तीन पराभव त्यांना जिव्हारी लागले आहेत. त्याविरोधात कारवाई म्हणून खेळाडूंना टी-२० लीगमधून खेळायला मज्जाव करण्यात येणार आहे. जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळायचं झाल्यास खेळाडूंना देशाच्या क्रिकेट मंडळाकडून परवानगीचं पत्र लागतं. पाक मंडळाने यापूर्वी खेळाडूंनी दिलेली अशी पत्रही काढून घेतली आहेत. (Asia Cup Drama)
आशिया चषकाच्या अंतिम फेरीत रविवारी पाकिस्तानचा भारताकडून ५ गडी राखून पराभव झाला आणि संबंध स्पर्धेत तीन वेळा दोन देश आमने सामने आले. यातील प्रत्येक सामना भारताने निर्विवादपणे जिंकला आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा हा चषकही जिंकला. हीच गोष्ट पाक मंडळाला रुचली नाहीए. (Asia Cup Drama)
(हेही वाचा – PCB : पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आता फ्रँचायझी लीगमध्ये खेळता येणार नाही)
२९ सप्टेंबरला पाक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमेर अहमद सईद यांनी खेळाडू आणि त्यांचे प्रसिद्धी एजंट यांना पत्र लिहून परवानगी रद्द करत असल्याचं कळवलं आहे. आणखी काही दिवसांत ऑस्ट्रेलियात बिगबॅश टी-२० लीग सुरू होत आहे आणि बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिझवान आणि फहीम अश्रफ हे पाक खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. त्यांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. इतकंच नाही तर १ ऑक्टोबरलाच इंटरनॅशनल टी-२० लीगसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे आणि त्यासाठी १६ पाक क्रिकेटपटूंच्या नावांची नोंदणी झाली आहे. पण, या लीगचे दरवाजेही पाक खेळाडूंसाठी बंद झाले आहेत. (Asia Cup Drama)
यंदाच्या आशिया चषकात पहिल्या भारत – पाक सामन्यापासून भरपूर नाट्य रंगलं. भारतीय खेळाडूंनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करायला नकार दिला. यावर पाक खेळाडूंनी स्पर्धा सोडण्याची धमकीही दिली. पण, अखेर आर्थिक नुकसानाला घाबरून ते स्पर्धेत खेळले आणि क्रिकेटच्या मैदानावर भारताविरुद्ध पराभव ते टाळू शकले नाहीत. (Asia Cup Drama)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

