- ऋजुता लुकतुके
एरिना सबालेंकासाठी हे वर्ष आव्हानात्मक गेलं आहे. एरवी तिचा खेळ आक्रमक आणि जोखमीने भरलेला असतो. पण, यंदा ही जोखीम अनेकदा तिला पराभवाकडे घेऊन गेली. वर्षातील दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत तिचा पराभव झाला. पण, युएस ओपनमध्ये मात्र दुसऱ्या सेटमध्ये १५ नाहक चुका करूनही तिच्या पदरी विजेतेपदाचं दान पडलं. आणि लढाऊ सबालेंकाला शेवटची ग्रँडस्लॅम जिंकण्याचं भाग्य लाभलं. तिने अंतिम फेरीत एनिमिसोवाचा ६-३ आणि ७-६ असा पराभव केला. हे तिचं सलग दुसरं युएस ओपन विजेतेपद आहे.(US Open 2025)
(हेही वाचा – BMC Election 2025 : बीएमसी निवडणुकीत ‘ठाकरे बंधू फॅक्टर’ चालेल का?)
यावेळच्या विजयाची गोष्ट आणखी सुखावणारी होती. कारण, एनिमिसोवा अमेरिकन आहे. त्यामुळे आर्थर ॲश स्टेडिअमवरील २०,००० लोक तिलाच पाठिंबा देत होते. पण, सबालेंकाने आपल्या नेहमीच्या आत्मविश्वासाने खेळ सुरू केला. आणि लागलीच प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस भेदून पहिला सेट ६-३ असा आरामात जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही सबालेंकाच्या जोरदार फटक्यांना एनिमिसोवाकडे उत्तर नव्हतं. पण, यावेळी सबालेंकाचाच खेळ काहीसा भरकटला होता. तिच्याकडून नाहक चुका होत गेल्या. आणि एनिमोसोवाला संधी मिळाली. सेटमध्ये ६-६ अशा बरोबरीनंतर टायब्रेकवर मात्र सबालेंकाने स्वत:ला सावरलं. आणि ७-३ असा टायब्रेक जिंकत सामनाही खिशात टाकला.
— Aryna Sabalenka Archive (@sabalenkarchive) September 7, 2025
सबालेंकानं आपलं क्रमवारीतील अव्वल स्थान आता आणखी मजबूत केलं आहे. तिचं हे चौथं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. आणि सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये फक्त जपानची नओमी ओसाका तिच्याबरोबर आहे. याशिवाय सेबालेंकाने हार्ड कोर्टवरच्या सलग सहाव्या स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली आहे. आणि युएस ओपन सलग दुसऱ्यांदा जिंकण्याची कामगिरी महिलांमध्ये सेरेना विल्यम्सनंतर पहिल्यांदाच केली आहे. सेरेनाने बरोबर १० वर्षांपूर्वी सलग दुसरं विजेतेपद पटकावलं होतं.
(हेही वाचा – Beach Cleaning : ‘समुद्र किनारपट्टी स्वच्छतेचे व्रत’)
सेबालेंकाचं मैदानातील वागणं यंदा वादग्रस्त ठरलं होतं. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम फेरीत प्रेक्षकांनी तिची हूर्यो उडवली. आणि त्यामुळे चिडलेल्या सेबालेंकाचा खेळातील तोलही ढळला. आणि तिचा मॅडिसन कीजकडून पराभव झाला. फ्रेंच ओपनमध्येही कोको गॉफने तिचा पराभव केल्यावर तिने आपला गॉगल काढून तिच्याकडे रागाने फेकला होता. पण, या प्रसंगानंतर सबालेंकाने गॉफची माफीही मागितली. आता युएस ओपन जिंकून सबालेंकाने वर्षाचा शेवट विजयाने केला आहे.


