
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
श्री गणरायांचे आगमन आता मंडपांमध्ये व्हायला लागले असून रविवारी बऱ्याच मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची मिरवणूक काढत मंडपात विराजमान केली. मात्र, या मिरवणुकीमुळे रस्त्यांवर होणारी गणेश भक्तांची गर्दी आणि यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे विसर्जनाच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेप्रमाणेच आगमनाच्या दिवशीही वाहतूक व्यवस्था एक मार्गिका ठेवली जावी अशाप्रकारची मागणीच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पोलिस आयुक्तांकडे केली आहे. (Ganeshotsav)
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पोलिस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ज्या प्रमाणे गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या दिवशी खासकरून गिरगाव चौपाटी आणि दादर चौपाटी येथे जाण्यासाठी प्रमुख मार्गिका एकेरी करून दुसऱ्या बाजूने केवळ गणेश विसर्जनासाठी मार्ग राखीव ठेवला जातो तशाच प्रकारे श्रींच्या आगमनासाठी वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. (Ganeshotsav)
(हेही वाचा – Tesla Charging Station : बीकेसीमध्ये टेस्लाचे पहिले चार्जिंग स्टेशन; काय आहेत चार्जेस ?)
विविध गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती रविवारी आपापल्या मंडपांमध्ये विराजमान झाल्या. या सर्व गणेश मूर्तींच्या वाजत – गाजत मिरवणूका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये मोठ्याप्रमाणात गणेश भक्त सहभागी झाल्याने मोठ्याप्रमाणात रस्त्यावर गर्दी निर्माण झाली होती आणि ही गर्दी नियंत्रण आणणे आणि वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवणे हे पोलिसांसाठी मोठे दिव्य ठरले होते. (Ganeshotsav)
आता पुढील पुढील दोन आठवड्यातील रविवारीही मुंबईतील हजारो मंडळे श्रींच्या मूर्ती कारखान्यांमधून आपल्या सोसायटींमध्ये नेतील. दादर लालबाग परळ येथील गणेश मूर्तीच्या कारखानातून या मूर्ती रवाना होतील. अशा ठिकाणी वाहतूक एकेरी केल्यास आणि दुसरी मार्गिका गणेश मंडळांसाठी श्रींच्या मूर्ती नेण्यासाठी राखून ठेवल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. या व्यवस्थेमुळे गणेश मूर्ती रस्त्यांमध्ये न थांबता मार्गस्थ होतील. तसेच एकेरी वाहतूक सुरू राहिल्याने वाहनधारकांची कोंडी होणार नाही. वाहतूक धीम्या गतीने पण सुरू राहिल असे समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड नरेश दहिबावकर यांनी निवेदनात म्हटले आहे. याकरिता वाहतूक पोलिसांनी अशा महत्वाच्या गणेश कारखान्याच्या आसपास परिसरात श्रींच्या आगमन सोहळ्यासाठी तात्पुरती नो पार्किंग ठेवल्यास श्रींच्या मूर्ती नेणेही सोपे जाईल, असेही त्यांनी त्यांनी म्हटले आहे. (Ganeshotsav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
