-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ सेवा खासगी संस्थेकडून घेण्यात येणार असल्याने या खासगीकरणाविरोधात सर्व कामगार संघटनांच्या संघर्ष समितीने येत्या मंगळवारी १ जुलै रोजी कामबंद आंदोलन करून संपाचा इशारा दिला होता. मात्र, आता या संपावर कामगार संघटना मोर्चावर आल्या असून मोर्चावरून आता मेळाव्यावर जावून स्थिरावल्याचे ऐकायला मिळत आहे. १ जुलै रोजी महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने दुपारी दोन वाजता भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहात हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. (BMC)
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांच्यावतीने २४ प्रशासकीय विभागांपैंकी २१ विभागांमध्ये कचरा उचलण्यासाठी वाहने आणि मनुष्यबळाची सेवा घेण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरु असून याला विरोध दर्शवण्यासाठी महापालिकेतील सर्व कामगार संघटना संघटीत होवून त्यांनी संघर्ष समिती गठीत केली आहे. या संघर्ष समितीच्यावतीने सर्व विभाग कार्यालयांच्याबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, या खासगीकरणाला विरोध म्हणून येत्या १ जुलै रोजी काम बंद आंदोलन करून संपाचा इशारा संघर्ष समितीने दिला होता. परंतु आता याबाबतची निविदाच ८ जुलै रोजी उघडल्या जाणार असल्याने त्यादिवशी आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय घेत १ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. पंरतु आता त्यातही बदल करत मंगळवारी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात कामगारांचा मेळावा दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे. (BMC)
(हेही वाचा – India-US Trade Deal : ‘अमेरिकेसोबत करार करायला…’; ट्रम्प यांच्या दाव्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केले भाष्य)
जर का महापालिकेने खाजगीकरणाचे काढलेले टेंडर मागे घेतले नाही आणि हे टेंडर ज्या दिवशी उघडले जाईल, तर त्याच दिवशी २४ विभागातील सफाई कामगार, कंत्राटी कामगार आणि मोटार लोडर कामगार तीव्र संघर्ष करतील. आणि तसे घडले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावरच राहील, अशी माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक वामन कविस्कर, बाबा कदम, रमाकांत बने, मिलिंद रानडे, एस. एम. राठोड, प्रकाश जाधव आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, ३० जुन २०२५ रोजी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासोबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्याने मंगळवार, १ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, राणीबाग, भायखळा या ठिकाणी मेळावा होणार असून या मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची माहिती निमंत्रक वामन कविस्कर आणि अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली. (BMC)
एकाही कामगाराचे नुकसान करणार नाही, लेखी हमी देण्याची प्रशासनाची तयारी
महापालिका उपायुक्त किरण दिघावकर (घनकचरा व्यवस्थापन) यांच्यी संपर्क साधला त्यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.यावेळी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पंरतु निविदा प्रक्रिया सुरु असून येत्या ०८ जुलै रोजी निविदा खुली करण्याची तारीख आहे. तोपर्यंत आपण विचार करावा. तसेच यामध्ये कुठल्याही कामगाराला कमी किंवा त्यांचे नुकसान करण्याचा उद्देश नाही. तसेच एकाही कामगाराला कमी किंवा कमी करण्यात येणार नाही याबाबत लेखी स्वरुपात दिले जात आहे. त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. प्रशासन कुठल्याही परिस्थितीत चुकीचे पाऊल उचलणार नाही याचीही हमी प्रशासनाच्यावतीने दिल्याचे दिघावकर यांनी सांगितले. (BMC)
सफाई कामगारांच्या चौक्यांची दुरवस्था
मुंबई शहर स्वच्छ झालेच पाहिजे, मुंबईचे शाघांय झालेच पाहिजे त्याबद्दल वाद नाही. परंतू मुंबई स्वच्छ करणाऱ्या कामगार कोणत्या परिस्थितीमध्ये काम करीत आहे. सफाई खात्यामध्ये जवळपास ४०० हजेरी चौक्या आहेत. दोन चार चौक्या सोडल्या तर बाकी चौक्यांवर स्त्रियांसाठी स्वतंत्र कपडे चेंजीग रुम, शौचालय, बाथरुमची सोय नाही. कामगार ७०-८० आणि एक शौचालय तोही तुटलेला, रेल्वे तिकिटाच्या लाईनला लोक उभे असतात. त्याप्रमाणे एकच शौचालय असल्यामुळे दर दिवशी १०-१५ कामगारांची लाईन असते. जो सफाई कामगार दुसऱ्याची घाण साफ करतो, त्यांच्या चौक्यांची किमान दुरुस्ती, हातपाय धुण्यासाठी स्वच्छ पाणी, वेदर शेड, चांगले प्रसाधनगृह, स्त्री कामगारांसाठी स्वतंत्र चेंजींग रुम, प्रसाधनगृहाची व्यवस्था करा. त्यानंतरच मुंबई स्वच्छ करण्याचा नारा द्या, अशी मागणी अशोक जाधव यांनी केली आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

