-
प्रतिनिधी
भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षांतराने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बारामतीत सुप्रिया सुळेंची राजकीय कोंडी करण्याचा डाव टाकल्याची चर्चा आहे.
(हेही वाचा – Pahalgam Attack Update: पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वेच्या सुरक्षेत वाढ)
बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघचा समावेश आहे. सध्या यापैकी एकाही मतदारसंघात महाविकास आघाडीचा (मविआ) आमदार नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित पवार-बारामती, दत्तात्रय भरणे-इंदापूर, दिलीप मोहिते-पाटील-खेड असे तीन, भाजपाचे दोन आमदार राहुल कुल-दौंड, भीमराव तापकीर-खडकवासला, आणि शिवसेनेच्या पुरंदर मतदारसंघात विजय शिवतारे आमदार आहेत. त्यामुळे एकमेव संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या भाजपा प्रवेशाने मविआची ताकद आणखी कमजोर झाली आहे.
थोपटे (Sangram Thopte) यांचा भोरमध्ये जनाधार आहे. त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनीही हा मतदारसंघ नऊ वेळा जिंकला होता. त्यांच्या पक्षांतरामुळे स्थानिक पातळीवर सुप्रिया सुळेंची पकड कमकुवत होऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपा आणि अजित पवार गटाने बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे. थोपटेंच्या प्रवेशाने स्थानिक निवडणुकीत भाजपाला फायदा होऊ शकतो. सुप्रिया सुळे यांच्यासमोर आता मतदारसंघातील प्रभाव टिकवण्याचे आव्हान आहे. येत्या काळात त्या कशी रणनीती आखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community