IPL 2025, RCB vs DC : ‘पाठलागांचा बादशाह’ विराट कोहली आणि कृणाल पांड्याने मिळवून दिला बंगळुरुला महत्त्वपूर्ण विजय

74
ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामन्याचा निकाल जरी सरळमार्गी असला तरी सामन्यात भरपूर नाट्य होतं. बंगळुरूचे गोलंदाज आणि फलंदाज दोघांचा खरा कस लागला. आणि त्यात ते विजयी झाले. नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला पहिली फलंदाजी दिल्यावर त्यांच्यासमोर आव्हान होतं, काहीशा धिम्या खेळपट्टीवर त्यांना लवकर रोखायचं. हे काम भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी केलं. अभिषेक पोरेल (२८) आणि फाफ दू प्लेसिस (२०) यांनी चांगली सुरुवात करूनही हेझलवूडने पहिल्याच षटकांत पोरेलला बाद करून बंगळुरूला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर गोलंदाजांनी डावावरील आपलं वर्चस्व जाऊ दिलं नाही. (IPL 2025, RCB vs DC)

(हेही वाचा – Indian Army साठी देणगी मागणाऱ्या फसव्या संदेशाला बळी पडू नका; संरक्षण मंत्रालयाचे आवाहन)

के एल राहुललाही (KL Rahul) फटकेबाजी सोपी जात नव्हती. त्याने ४१ धावा केल्या त्या ३९ चेंडूंत आणि ट्रिस्टियन स्टब्जने १८ चेंडूंत ३४ धावा केल्या. सुरुवातीला खेळपट्टी चांगलीच धिमी होती. आणि एकाही फलंदाजाला पहिल्या डावांत अर्धशतक करता आलं नाही. अखेर निर्धारित २० षटकांत दिल्लीने ८ बाद १६२ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने ३३ चेंडूंत ३ बळी घेतले. तर जोश हेझलवूडने २ बळी मिळवले. बंगळुरूने निम्मं काम तर केलं. पण, धावांचा पाठलाग करतानाही त्यांची अवस्था ३ बाद २२ झाली होती. त्यावेळी पाठलागांचा बादशाह विराट कोहली (Virat Kohli) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) संघाच्या मदतीला धावून आला.

विराटने नेहमीसारखी एक बाजू लावून धरून अधिक पडझड होणार नाही. आणि संघ धावगतीत मागे राहणार नाही याची जबाबदारी उचलली. आणि दुसऱ्या बाजूने कृणाल पांड्याने संघावरील दडपण कमी करण्याचं काम केलं. ४७ चेंडूतील ७३ धावा या हंगामातील सर्वोत्तम खेळींपैकी एक ठरावी. महत्त्वाचं म्हणजे विराटबरोबर चौथ्या गड्यासाठी त्याने ११९ धावांची भागिदारी केली. या भागिदारीने सामना फिरवला. अखेर विजयासाठी १७ धावा हव्या असताना विराट मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नांत ५१ वर बाद झाला. पण, तोपर्यंत ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर चढलेली होती.

तर त्याचा साथीदार जोश हेझलवू़डच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे. या विजयाबरोबरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आता गुण तालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. इतकंच नाही तर या आयपीएलमध्ये बंगळुरूने पाहुणे म्हणून खेळताना मिळवलेला हा सलग सहावा विजय आहे. आयपीएलमध्ये आता गुणतालिका, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी स्पर्धा कमालीची वाढली आहे. प्रत्येक सामन्यानंतर चित्र बदलतंय. सोमवारी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे. आणि इथंही गुजरातला पुन्हा अव्वल होण्याची तसंच साई सुदर्शनला ऑरेंज कॅपची संधी आहे. (IPL 2025, RCB vs DC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.