उन्हाळा जवळ आला की आपण तर कूलर, एसी लावून उष्णतेचा सामना करतो. पण बिचाऱ्या पशू-पक्ष्यांचे काय, असा एक सहानुभूतीचा विचार व्यक्त होतो. मग त्यांच्यासाठी बाल्कनीत पाणी ठेवले जाते. कुठे पर्यटनस्थळी गेलो की, तेथील पशू-पक्ष्यांना पाणी, खाऊ दिला जातो. (Feeding to Animals and Birds) आपल्याकडे अशा पद्धतीने विचार करण्याला प्राणीप्रेम म्हटले जाते; पण त्यांना असे आयते अन्न-पाणी देणे, हे खरेच योग्य आहे की आपल्या भूतदयेच्या वागणूकीने त्यांना परावलंबी करतो, याचे विचारमंथन होणे आवश्यक आहे. याविषयावर प्रकाश टाकणारी तथ्ये समोर आणली आहेत, कॉर्बेट फाऊंडेशनचे संचालक केदार गोरे (Kedar Gore) यांनी ! प्राण्यांना पाणी, अन्न द्यावे का, हे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत…
(हेही वाचा – Honor Killing Andhra Pradesh : आंध्रप्रदेशात हिंदू युवकाशी लग्न करणाऱ्या मुसलमान मुलीचा संशयास्पद मृत्यू; ऑनर किलिंगचा संशय)
वन्य जीव (Wild Animals) शेकडो वर्षांपासून या पृथ्वीतलावर आहेत. उष्णतेतील वाढ काही नवी नाही. अनेक वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात उष्णतेच्या लाटा येत आहेत. त्या सर्व परिस्थितींशी हे वन्य जीव जुळवून घेत आले आहेत. आपण मानव आता बराच काळ एसीमध्ये राहतो. त्यामुळे एसीमधून बाहेर गेलो की, उष्णतेची लाट आपण सहन करू शकत नाही. वातावरणातले बदल स्वीकारण्याची आपली क्षमता कमी झाली आहे. वन्य जीवांचे तसे नाही. ते वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
जंगल वन्य जीवांना सर्व स्थितीत आसरा देते
कितीही उष्णता वाढली, तरी जंगलात अनेक ठिकाणी आसरा घेण्याची ठेवणे असतात. खूप उष्णता वाढली, तर वन्य प्राणी पाण्यात किंवा पाणवठ्या जवळ जाऊन बसतात नंतर पाणीसाठे आटले, तरी ते सभोवतालच्या दमट मातीत किंवा झाडाच्या सावलीत थंड ठिकाणी बसतात. त्यांच्या बाहेर पडण्याच्या, शिकार करण्याच्या किंवा अन्न शोधण्याच्या वेळा बदलतात. पण उष्णता वाढली; म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईलच असे नसते.
उन्हाळा आला की, आपण आपल्या दृष्टीकोनातून वन्यजीव, पशू-पक्षी यांचा विचार करतो, हेच चुकीचे आहे. आपल्याला त्यांच्या विषयी वाटलेल्या भूतदयेमुळे आपण मानवी वस्त्यांमध्ये त्यांच्यासाठी घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या आवारात पाणी ठेवतो. मुंबईच्याच दृष्टीने विचार केला, तरी कितीही उष्णता वाढली, तरी शहरातील पाणीसाठे संपले आहेत का हा विचार करायला हवा. पक्षी उडत असल्यामुळे त्यांची दूरवर जाऊन पाणी शोधण्याची क्षमता असते हे विसरून चालणार नाही. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशांतही अनेक प्रजातींचे पक्षी आहेत. उष्माघाताने जर पक्षी-प्राणी मरण्याचे प्रमाण खूप असते तर तेथे अनेक ठिकाणी मृत पक्षी पाहावयास मिळाले असते. पण तसे होत नाही कारण वन्यजीवांमध्ये उपजतच पाण्याचा शोध घेण्याची क्षमता असते. आपण बाल्कनीत पाणी ठेवले, तर पक्षी येऊन ते पिणारच आहेत; पण आपण लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्यात दूर दूर पर्यंत जाऊन पाणीसाठे शोधण्याची क्षमता आहे. आपण जवळ कृत्रिम पाणीसाठा उपलब्ध करून दिला, तर त्यांची ती क्षमता कमी होत जाते.
अन्न-पाणी शोधणे, हे प्राण्यांचे शिक्षणच
कुनो राष्ट्रीय उद्यानातील (Kuno National Park) चित्त्यांना पाणी दिल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहे. अनेक लोकांना हे पुण्यकर्मही वाटत आहे. पण याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. भारतातून नामशेष झालेले चित्ते भारतात पुन्हा नांदावेत म्हणून भारत सरकारने हे चित्ते आणले आहेत. ते नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या शुष्क प्रदेशातील आहेत. हे प्रदेश चित्त्यांचे नैसर्गिक अधिवासच आहेत. तेव्हा चित्त्यांना पाण्याचे साठे शोधणे सहज शक्य आहे. असे असूनही ऊन आहे; म्हणून आपण आयते पाणी ठेवले, तर ते जरूर तिथे येतील. पाणी पितीलही, पण त्यांच्यातील अन्न-पाणी शोधण्याची नैसर्गिक क्षमता हळूहळू नाहीशी होईल. त्या व्हिडिओमध्ये एक मादी आहे, तिच्यासोबत तिची पिल्लेही होती. त्यांनाही जर आयते पाणी मिळाले, तर भविष्यात पाणी कसे शोधायचे हे जगण्यासाठीची अत्यावश्यक शिक्षा आपल्या आईकडून ते कसे बरे शिकतील? आपण आपले शिक्षण घेण्यासाठी ज्याप्रमाणे शाळा, महाविद्यालयांत जातो, तसेच अन्न-पाणी कसे शोधायचे, हे प्राण्यांचे शिक्षण आहे.
आयते अन्न-पाणी, हे पक्ष्यांच्या क्षमतेला आव्हान
अशी काही उदाहरणे आहेत. अन्न-पाणी आयते मिळाल्याने प्राण्यांतील लठ्ठपणा वाढू शकतो. त्यांची चयापचय (metabolism) क्रिया बिघडू शकते. मानवाला जशी मेहनत करून उदरर्निर्वाह करावा लागतो त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांनीही अन्न पाण्याचा शोध घेणे, त्यासाठी शारीरिक ऊर्जा खर्च करणे आवश्यक आहे.
उन्हाळा आहे; म्हणून आपण घराबाहेर पाणी ठेवले, तर तिथे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतील. आपल्या सध्याच्या जीवनशैलीत आपण ते पाण्याचे भांडे दररोज स्वच्छ करू शकत नाही. अशा वेळी काही इन्फेक्शन्स झाले, तर त्याला कोण जबाबदार? कायमस्वरूपी वन्यजीवांना मानवावर अवलंबून राहायला भाग पडणे कितपत योग्य आहे?
आपण काय करू शकतो ?
वन्यजीवांचा आपल्या दृष्टिकोनातून विचार करणे आपण सोडले पाहिजे. त्यांना त्यांची आव्हाने स्वीकारू देत. आपल्याला वन्यजीवांसाठी खरोखरच काही करायचे असेल, तर आपण त्यांचा नैसर्गिक अधिवास टिकविण्याचा व तो वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. जिथे शक्य होईल, तिथे स्थानिक प्रजातींची झाडे-झुडूपे लावू शकतो. आयुष्यात मी किमान २० स्थानिक झाडे लावली आणि चांगल्या प्रकारे जगवली, तर त्याने वन्यजीवांसाठी अनमोल योगदान ठरू शकते. त्यांना अन्न-पाणी खिडकीत ठेवण्यापेक्षा नैसर्गिक अधिवासांत हक्काने अन्न, पाणी मिळणार आहे, तो त्यांचा अधिवास असलेली जंगले, पाणथळ स्थळे, गवताळ प्रदेश, कांदळवेन टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
मजा म्हणून वन्य जीवांना खाऊ द्यावा का ?
मुंबईमध्ये हिवाळ्यात कुरव (seagull) पक्षी शेकडो किलोमीटरचे अंतर स्थलांतर करून येतात. मरीन ड्राईव्ह परिसरात, मुंबईहून बोटीहून अलिबागला जाताना ते मोठ्या प्रमाणात दिसतात. आपल्याकडे पर्यटनाला जाणारे त्यांना चिप्स, वेफर्स, फरसाण इत्यादी फराळाचे पदार्थ खायला देतात. त्या पक्ष्यांना आपण दिलेले खाद्य हवेतच लीलया झेलून खाताना आपल्याला आनंद होतो; किंबहुना काही काळापुरते आपले मनोरंजन होते. याचे व्हिडिओ बनवले जातात, रिल्स ‘लाईक्स’च्या हव्यासापायी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातात. पण आपल्या मजेच्या नावाखाली, आपण त्यांना जे खाद्य देत आहोत, ते खरेच त्यांचे खाणे आहे का? ते पाण्यातील मासे व इतर जीव खातात आणि त्यांच्या अन्नाची कोणतीही कमतरता निर्माण झालेली नाही. कुरव शेकडो किलोमीटर प्रवास करून आपल्या प्रदेशात येतात. त्यांना परत जातानाही तेवढाच प्रवास करायचा आहे. काही वेळा ते दिवस-रात्र कुठेही न थांबता उडत राहतात. एवढा प्रवास करण्यासाठी त्यांना जे पोषण हवे आहे, ते चिप्स खाऊन मिळेल का, याचा विचार खाणे देणाऱ्यांच्या मनातही येत नाही हे दुर्दैवी आहे.
प्राणी-पक्ष्यांविषयीची भूतदया पाळीव प्राण्यांपर्यंतच (Pets) मर्यादित ठेवावी. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या पक्षी, प्राणी व इतर वन्यजीवांना आपल्या पोकळ भूतदयेच्या विळख्यात अडकवू नका, ही कळकळीची विनंती. (Feeding to Animals and Birds)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community