- चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.
सनातन धर्मातील अध्यात्म वैज्ञानिक परिभाषेत शिकवण्यासाठी आणि सनातन धर्म आचरणात आणून मानवी जीवन आनंदी बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तिचे शास्त्रज्ञ आणि अध्यात्मातील अधिकारी संत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी २२ मार्च १९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली. या वर्षी सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक आणि कार्य यांचा परिचय करून देणारा हा लेखप्रपंच !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे स्वतः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ आहेत. वर्ष १९७१ ते १९७८ या कालावधीत त्यांनी इंग्लंडमध्ये क्लिनीकल हिप्नोथेरपी अर्थात् वैद्यकीय संमोहन उपचार या विषयावर विस्तृत संशोधन केले. इओसिनोफिलीया हा रक्तांच्या पेशींचा रोग मानसिक कारणांमुळे होतो याचा वैद्यकीय क्षेत्रात पहिला शोध त्यांनी लावला. मनोविकारांवर स्वसंमोहनाची उपचार पद्धती असलेल्या स्वयंसूचनांचा शोध त्यांनी लावला. वर्ष १९७८ ते वर्ष १९९५ या कालावधीत ते स्वतः वैद्यकीय व्यवसायात कार्यरत होते. जेव्हा त्यांच्याकडे येणार्या रुग्णांपैकी जवळपास ३० टक्के रुग्ण नेहमीच्या उपचारपद्धतींनी बरे न होता कुणा संतांकडे गेल्यानंतर, धार्मिक विधी केल्यानंतर किंवा आध्यात्मिक उपचार केल्यानंतर बरे होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांच्या मनात अध्यात्माविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी अनेक संतांकडे जाऊन अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करून घेतले. स्वतः साधना केली. तेव्हा वैद्यकीय क्षेत्रापेक्षाही प्रगत असे शास्त्र आहे आणि ते म्हणजे अध्यात्मशास्त्र, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सनातन धर्मातील अध्यात्मशास्त्राचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला आणि समाजाला अध्यात्म वैज्ञानिक भाषेत शिकवण्यासाठी ग्रंथ लेखन, प्रवचने, अभ्यासवर्ग, आदींच्या माध्यमातून अध्यात्मप्रसाराचे कार्य आरंभले.
२. सनातनचे व्यापक कार्य :
२ अ. अध्यात्म आणि साधना शिकवणे : सनातनचे मुख्य कार्य अध्यात्मप्रसार आणि समाजाला साधना शिकवणे, हे आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन, तसेच अभ्यासवर्ग घेतले जातात. साधना शिकवण्यासाठी विनामूल्य साधना सत्संग, साधना शिबिरे, युवा साधना सत्संग, युवा साधना शिबिरे, तसेच बालसंस्कारवर्ग आयोजित केले जातात. हजारो जण या सत्संगांना जोडून आज आनंदी जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करत आहेत. संस्थेच्या वतीने सैनिक, पोलीस, बँक कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर, सरकारी कर्मचारी, आय.टी. कर्मचारी आदींसाठी मानसिक तणाव नियंत्रण कार्यशाळा यांचेही आयोजन केले जाते. याशिवाय संस्थेच्या वतीने व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळांचे आयोजन केले जाते. व्यक्तीमत्त्वात असलेल्या त्रुटींच्या मूळाशी व्यक्तीच्या स्वभावातील राग, आळस, स्वार्थ आदी स्वभावदोषच कारणीभूत असतात. ते दूर केल्याने शाश्वत व्यक्तीमत्त्व विकास होतो. त्या दृष्टीने या कार्यशाळेत स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकवली जाते. सगळ्या संतांनी षड्रिपु निर्मूलनाविषयी, तसेच अंतःकरण शुद्धीविषयी सांगितले आहे. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकवणे हे सनातनचे वैशिष्ट्य आहे. ही प्रक्रिया कृतीत आणल्याने स्वभावामध्ये आमूलाग्र सकारात्मक पालट झाल्याचा आणि जीवन आनंदी झाल्याचा अनुभव अनेकांनी घेतले आहेत.
याशिवाय संस्थेच्या वतीने कुंभमेळा, मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांच्या वेळी धर्मशिक्षण देणारे फलक, आध्यात्मिक ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात येते. शाळांमध्ये आध्यात्मिक प्रश्नमंजुषा, तसेच नैतिक मूल्यांविषयी व्याख्याने घेण्यात येतात. गुरु-शिष्य परंपरेचे संवर्धन होण्यासाठी शेकडो गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे केले जातात.
(हेही वाचा Sanatan Sanstha : सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान)
धार्मिक विधींचे शास्त्रानुसार पौरोहित्य व्हावे, तसेच यजमानांना धार्मिक विधींचे शास्त्र आणि महत्त्व सांगणारे पुरोहित निर्माण व्हावे, या उद्देशाने सनातन-साधक पुरोहित पाठशाळाही कार्यरत आहे. या व्यतिरिक्त हिंदु धर्माविषयी होणार्या टीकेचा वैचारिक प्रतिवाद करणारे, तसेच हिंदु धर्माची बाजू प्रभावीपणे मांडणारे वक्ते सिद्ध व्हावेत, या उद्देशाने सनातनच्या वतीने वक्ता-प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात.
२ आ. ग्रंथसंपदा : सनातनच्या आध्यात्मिक कार्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अध्यात्माचे ज्ञान देणार्या अमूल्य ग्रंथसंपदेची निर्मिती. या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथांमध्ये आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्माची शिकवण देण्यात आली आहे. त्यामुळेच अध्यात्मात रूची असणार्यांकडून या ग्रंथांना मोठी मागणी आहे. सनातनच्या वतीने फेब्रुवारी २०२४ पर्यंत १३ भारतीय भाषांमध्ये ३६५ ग्रंथांच्या ९५ लाख ९६ हजार प्रती प्रकाशित करण्यात आल्या आहेत, अजूनही ५ हजार ग्रंथ प्रकाशित होतील, एवढे लिखाण सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्गीकरण करून संग्रहित केले आहे. एवढ्या ज्ञानाचा प्रचंड संग्रह असणे, तसेच एखाद्या आध्यात्मिक संस्थेच्या ग्रंथांच्या १ कोटींच्या जवळपास प्रती मुद्रित होणे, ही गोष्ट विरळ आहे.
२ इ. गुरुकुलासम सनातन आश्रम : सध्याच्या काळात आज राजकारण्यांनी सर्व क्षेत्रात जात आणून समाजात जातीजातीचे विष पेरलेले आहे. त्यामुळे जातीद्वेष वाढण्याला गलिच्छ राजकारण कारणीभूत आहे. हा जातीद्वेष केवळ समाजाला आध्यात्मिक बनवून रोखता येऊ शकते, असे आमचे मत आहे. उदाहरणच द्यायचे, तर या पार्श्वभूमीवर सनातनच्या आश्रमातील जातीनिरपेक्षता ठळकपणे दिसणारी आहे. आश्रमात कुणालाही कोणाची जात विचारली जात नाही. प्रत्येक साधकबंधू आहे, गुरुबंधू आहे, या आध्यात्मिक भावाने त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सनातन आश्रम हे शेकडो सदस्यांचे एक कुटुंबच बनले आहे. ईश्वरप्राप्तीच्या माध्यमातून एकसंध समाज निर्माण करता येतो आणि रामराज्याची अनुभूती घेता येते, हे सनातनच्या आश्रमातून अनुभवता येते. ज्यांना आनंदप्राप्तीसाठी पूर्णवेळ साधना करायची आहे, त्यांच्यासाठी संस्थेने गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती केली आहे. सनातनच्या आश्रमांतून अविरतपणे राष्ट्र आणि धर्म कार्य चालू आहे. चैतन्याची अनुभूती देणारे सनातन आश्रम पहाण्यासाठी, तसेच साधना जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील अनेक जिज्ञासू आश्रमांना भेट देतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून देशभरात अनेक ठिकाणी सनातनचे आश्रम असून तेथे अनुमाने हजारो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत.
२ ई. यज्ञयाग : यज्ञयाग हे सनातन संस्कृतीचे अंग आहे. विश्वकल्याणासाठी यज्ञयाग करण्याची आपली परंपरा आहे. यज्ञाचा पर्यावरणावर, तसेच मानवजातीवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो, हे वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे. सनातनच्या आश्रमात आतापर्यंत ४५० हून अधिक यज्ञ आणि धार्मिक विधी झाले आहेत. यामध्ये साग्निचित् अश्वमेध महासोमयाग, उच्छिष्ट गणपति यज्ञ, चंडीयाग, धन्वंतरि याग, संजीवनी होम, पंचमहाभूत याग आदी यागांचा समावेश आहे. या यज्ञयागांचा संकल्प अर्थात्च व्यक्तीगत नव्हता, तर धर्मकार्यात येणारे अडथळ्यांचे निवारण व्हावे, साधना करणार्या जीवांना होणारे त्रास दूर व्हावेत, तसेच रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, असा समष्टीच्या कल्याणाचा होता.
३. सनातन संस्थेची हिंदु राष्ट्राची संकल्पना : सध्या हिंदु राष्ट्राची चर्चा समाजात होते, ती प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात होते. ‘हिंदूंचे हित साध्य करणारी राज्यव्यवस्था’, असा एक विचार सध्या लोकप्रिय होत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आध्यात्मिक राष्ट्ररचनेला हिंदु राष्ट्र’ म्हटले आहे. वर्ष १९९८ मध्ये त्यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ संकलित केला होता. त्यात समाजाला सत्त्वगुणी बनवणे, अध्यात्मकेंद्रीत राज्यव्यवस्था स्थापन करणे आणि त्यायोगे विश्वकल्याण साध्य करणे, ही हिंदु राष्ट्राची संकल्पना सांगितली होती. पुढे हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा पुस्तकात त्यांनी ‘विश्वकल्याणासाठी कार्यरत सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र’, अशी हिंदु राष्ट्राची व्याख्या केली होती. थोडक्यात हिंदूंचे हितच नव्हे, तर विश्वकल्याण साध्य करणे आणि त्यासाठी सत्त्वगुणी समाज निर्माण करणे, हा सनातन संस्थेचा विचार आहे.
४. सनातनवरील आरोपांची वस्तुस्थिती : सनातनची २५ वर्षे म्हणजे सनातनच्या साधकांच्या आणि शुभचिंतकांच्या निस्वार्थ समर्पणाची २५ वर्षे आहेत. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता; कारण याच काळात सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न झाला. निरीश्वरवाद्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हजारो साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. असा संघर्षाचा काळ अनुभवत सनातन संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास झाला आहे. राजकीय शक्तींना लक्ष्य करण्यासाठी अथवा ‘ब्लेम गेम’ खेळण्यासठी समाजातील ‘सॉफ्ट टार्गेट’ (सोपे लक्ष्य) हवे असतात. त्यात सनातन संस्था गेल्या काही वर्षांपासून हिंदु धर्माचा अत्यंत तेजस्वी प्रसार करत आहे. त्यामुळे समाज धर्माचरणी आणि श्रद्धावान बनत आहे. यामुळे नास्तिकतावादी, पुरोगामी, अंधश्रद्धा-निर्मूलनवादी, हिंदुद्वेषी यांचे धंदे बंद होऊ लागले होते. धर्म न मानणार्या पुरोगाम्यांना हा तेजस्वी प्रसार सहन होत नाही; म्हणून सनातन संस्थेला लक्ष्य करण्यात येते.
(हेही वाचा Sanatan Sanstha : सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा 81वा जन्मोत्सव साजरा)
वर्ष १९४७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काँग्रेस, निधर्मी, साम्यवादी आदी मंडळींचा ‘सॉफ्ट टार्गेट’ राहिला. वर्ष २०१४ नंतर संघाचा स्वयंसेवक हा प्रधानसेवक (पंतप्रधान) झाला. एक प्रकारे संघ मोठा झाल्याने ‘सॉफ्ट टार्गेट’ होऊ शकत नव्हता. मग अनेक राज्यांत हिंदुत्वाचे कार्य करते; म्हणून सनातन संस्थेला ‘सॉफ्ट टार्गेट’ करण्यात आले. वर्ष २००८ पर्यंत म्हणजे १९९३ च्या बाँबस्फोटांपासून, संकटमोचन मंदिर (वाराणसी), अक्षरधाम मंदिर (गुजरात), मुंबईच्या रेल्वेतील साखळी स्फोट, कसाबच्या उपस्थितीतील मुंबईवरील आतंकवादी आक्रमण या सर्व घटनांवर कार्यवाही करणे म्हणजे कुठे तरी अल्पसंख्यांकांच्या मतावर परिणाम करणे होय, असे तत्कालीन राज्यकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे समाजाच्या दोन्ही घटकांवर आम्ही कारवाई करतो, असे दाखवण्यासाठी ‘भगवा आतंकवादा’चे षड्यंत्र रचण्यात आले. याचा खुलासा केंद्रीय गृहखात्यातील तत्कालीन अपर सचिव आर.व्ही.एस्. मणि यांनी त्यांचे पुस्तक ‘दी मिथ ऑफ सॅफ्रन टेरेरिझम’ या पुस्तकात केला आहे. या पुस्तकातील ११४ पृष्ठांवर गोव्यातील मडगाव स्फोटाविषयी कशी भगव्या आतंकवादाची दिशा द्यायची, याविषयी केंद्रीय गृहखात्यात झालेला चर्चेचा तपशील दिला आहे. न्यायालयानेही वर्ष २०१३ मध्ये मडगाव स्फोटातून सनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तता करतांना म्हटले होते की, ‘घटनेचा तपास करण्याची अनुमती स्थानिक जिल्हाधिकार्यांकडून न घेता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिवांकडून घेणे कार्यपद्धतीचे उल्लंघन आणि संशयास्पद होते…. तसेच सनातन संस्थेला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यासाठीच हा प्रथम माहिती अहवाल (एफ.आय.आर.) बनवण्यात आला आहे….’ थोडक्यात तत्कालीन काँग्रेसी राजवटीत सनातनला ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यासाठी ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आले. दाभोलकर-पानसरे या नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणात सनातनचे नाव गोवले गेले. भारतात प्रतिदिन शेकडो हत्या होत असतांना केवळ याच हत्यांना चर्चेत ठेवून एक विशिष्ट दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? सनातनविषयी एक नॅरेटिव्ह तयार केला जात आहे. साम्यवाद्यांकडून काही विशिष्ट हत्यांच्या संदर्भात चर्चा घडवली जाते, हा साम्यवाद्यांचा वैचारिक आतंकवाद आहे. कोणत्याही हत्यांशी सनातनचा कुठलाही संबंध नाही. आणि हे सत्य न्यायालयीन अग्निदिव्यातून बाहेर पडेल, अशी सनातनची योगेश्वर भगवान श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा आहे.
५. सनातनचे मानवजातीच्याा हिताचे ध्येय : सनातन ही समाजाची आध्यात्मिक सेवा करणारी, श्रद्धासंवर्धन चळवळीतील एक अग्रणी संस्था आहे. ‘मनुष्यजन्माचे सार्थक करण्यास शिकवणार्या हिंदु धर्मावर श्रद्धा ठेवून साधना करा आणि जीवनाचे सार्थक करा !’, ही सनातन संस्थेची मुख्य शिकवण आहे. सनातनला हिंदु धर्मावरील श्रद्धेच्या संवर्धनातून धर्माचरणी प्रजेची निर्मिती करायची आहे; कारण ‘सुखस्य मूलं धर्मः ।’ म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरण करण्यात आहे, असे धर्म सांगतो. श्रद्धेचा प्रसार केल्याने समाज धर्माचरणी बनतो. धर्माचरणामुळे नीतीमत्तेचा उत्कर्ष होतो. असा नीतीवान समाजच राज्यव्यवस्थेचे आदर्शरित्या संचालन करू शकतो. सनातन संस्था विश्वकल्याणकारी आध्यात्मिक हिंदु राष्ट्राचा पुरस्कार करते. त्याद्वारे सनातन संस्थेला अखिल मानवजातीचे हित साध्य करायचे आहे.
Join Our WhatsApp Community