पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) बनावट व्हिसा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (Crime ) केला आहे. गरजू व्यक्तींना ब्रुनेई या देशात काम देतो, असे सांगून बनावट व्हिसा आणि वर्कऑर्डर तयार करून फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश करत हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. २८ जानेवारी रोजी पोलिसांनी आरोपींच्याया मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ६८ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मनिष कन्हैय्यालाल स्वामी, वय ३२, रा. गडच्या मागे, राज का बारा, विश्वकर्मा भवन जवळ, चुरू, जि. चुरू, राज्य राजस्थान याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तकार दिली आहे. त्यावरून विजय प्रताप सिंग( वय ४४, रा. अमर जाधव यांची रूम, साई नगर, मामुर्डी, पुणे मूळ गाव रा. पो. सलामतपूर, जि. गाजीपूर, उत्तर प्रदेश), किसन देव पांडे, (वय ३५, रा. अमर जाधव यांची रूम, साईनगर, मामुर्डी, पुणे मूळ गाव रा. माजापुर, जि. सुलतानपुर, उत्तरप्रदेश,), हेमंत सिताराम पाटील( वय ३८, रा. लेखा फार्मच्या मागे, मुकाई चौक, रॉयल पार्क, फ्लॅ नं १०२, किवळे, पुणे मूळ गाव रा. गवळे नगर, ता. धुळे, जि. धुळे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७०, ४७६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Vishva Hindu Parishad: अयोध्येतील कार्यक्रमात देशभरातून ८ कोटी लोकांचा सहभाग)
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायात काम करत होते. तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. हेमंत पाटील याने यापूर्वी नोकरीच्या आमिषाने लोकांना फसवण्याचा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या विजय आणि किसन या साथीदारांसोबत मिळून लोकांच्या फसवणुकीचा नवीन फंडा शोधून काढला.
भारतातून वेल्डर, वाहन चालक, प्लंबर असे काम करणारे कामगार एक ते दोन वर्षांसाठी विदेशात जातात. तिथे काम करून एकरकमी पैसे घेऊन भारतात येतात. त्यांना व्हिसा देण्यासाठी एजंट कंपनी सुरू करून त्याद्वारे लोकांकडून व्हिसा काढण्यासाठी पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन पळून जायचे. आरोपींनी ब्ल्यू ओशन मरीन कंपनी या नावाने आयकॉन टॉवर, युनिट नं. १०२ कस्तुरी चौकाजवळ या ठिकाणी ऑफीस थाटले होते.ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर आदी कामगार हवे असल्याचे भासवून त्यांनी नोकरीच्या आमिषाने त्यांनी अनेक गरजू आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांकडून पैसे उकळले. त्यांना बनावट व्हिसा आणि वर्कऑर्डर देऊन त्यांची फसवणूक केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींनी थाटलेल्या ऑफीसवर छापा घातला असता तेथे बनावट वर्कऑर्डर व ६७ पासपोर्ट पोलिसांना आढळले. त्यातील ४८ पासपोर्टवर NEGARA BRUNEI DARUSSALAM या देशाच्या व्हिसाचे बनावट शिक्के होते. पोलिसांनी ते पासपोर्ट आणि तेथे असलेले दोन लॅपटॉप, एक कॉम्पुटर व ७ मोबाईल, बनावट शिक्के असा एकूण १ लाख ६८ हजार १५० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला.
तपासपथकाचे सहायक निरीक्षक राम गोमारे यांनी हेमंत पाटील याची कसून चौकशी केल्यावर त्याने व्हिसाचे बनावट शिक्के युनिक प्रिंटर्स अँड झेरॉक्स, गाळा नंबर ५ व ६, श्रीजी टेरेस बिल्डींग, शिवसाई चौक, पुर्णानगर, चिखली पुणे येथून बनवून घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दुकानाचे मालक किरण अर्जुन राऊत, वय ३४, रा. शिव अपार्टमेंट, फ्लॅ नं १३, शाहु नगर, चिंचवड, पुणे यांच्याकडे तपास करता त्यांनी कोणतीही खात्री न करता पैशाच्या लालसेने व्हिसाचे बनावट शिक्के तयार करून दिल्याची कबुली पोलिसांकडे दिली.त्यामुळे पोलिसांनी बनावट शिक्के बनवण्यासाठी वापरलेले मशीन व इतर साहीत्य असा ६० हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून किरण राऊत यांना अटक केली आहे.
आरोपी विजयप्रताप सिंग याच्याकडे तपास करता त्याने काही पासपोर्ट तो रहात असलेल्या परिसरातील डिटॉक्स लॉड्रीचे मालक शिरीष आनंद वानखेडे, वय ५७, रा. सिंधुनगर, एलआयसी कॉलनी, से. २५, घ.नं. ११/२, निगडी प्राधिकरण, पुणे यांचेकडे ठेवले असल्याची कबुली दिली.पोलिसांनी तेथे जाऊन वानखेडे यांच्याकडे तपास केला असता त्यांनी आरोपी विजयप्रताप सिंग याला आपण चार महिन्यांपासून ओळखतो. त्याने महत्त्वाची कागदपत्रे आहेत म्हणून ठेवण्यास दिलेली पिशवी पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यात ५८ पासपोर्ट आढळले. पोलिसांनी ते जप्त केले.
आरोपींनी तयार केलेले १२५ पासपोर्ट
आरोपींनी तयार केलेले १२५ पासपोर्ट, बनावट व्हिसाचे स्टॅम्प पोलिसांनी हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे एव्हढ्या लोकांची फसवणूक करणारी ही टोळी पुढील सात दिवसात पसार होणार होती. तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. ही कामगिरी विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, बापू बांगर, उप आयुक्त परिमंडळ २, डॉ. विशाल हिरे, सहायक आयुक्त वाकड विभाग, श्रीराम पौळ, वरिष्ठ निरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीसठाण्याच्या तपास पथकातील, राम गोमारे सहायकनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, नरेश बलसाने, हवालदार कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, मंगेश सराटे, नाईक रितेश कोळी, अरुण नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, शिपाई अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे व सागर पंडित यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community