मागील अडीच वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यामध्ये विस्तव जात नाही. राज्यपाल राज्यात समांतर सत्ता राबवतात, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी अनेकदा राज्यपालांवर टीका केली आहे. मात्र शुक्रवारी, १७ जून रोजी अवघ्या महाराष्ट्राला वेगळे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे दोघे चक्क राजभवनात आले आणि त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यपालांनी आदित्यच्या खांद्यावर ठेवला हात
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे रबर स्टॅम्प म्हणून काम करत नाहीत. राज्यपाल त्यांचे विशेष अधिकार वापरून प्रशासनावर नियंत्रण ठेवत आहेत, राज्यातील विविध समाज घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे उघडण्याच्या विषयावरुन खरमरीत पत्र लिहून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्यपालांवर जहरी टीका केली होती. राज्यपालांनी सरकारने विधान परिषदेसाठी १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर स्वाक्षरी केली नाही, त्यामुळे राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद आणखी चिघळला आहे. अशा सर्व परिस्थितीत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या वाढ दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे राजभवनात गेले, त्यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ व शाल देऊन शुभेच्छा दिल्या, त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवला.
Join Our WhatsApp Community