Veer Savarkar : सावरकरांचे हिंदुत्व आणि सैन्य भरती

Veer Savarkar : सैन्य भरती करण्यासाठी हिंदुस्थानातील तरुणांना इंग्रजी सैन्यात प्रवेश देणे ब्रिटिश सरकारला क्रमप्राप्त आहे. हे सावरकरांनी त्यावेळी जाणले आणि आपल्या देशातल्या हिंदू तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले.

192
Veer Savarkar : सावरकरांचे हिंदुत्व आणि सैन्य भरती
Veer Savarkar : सावरकरांचे हिंदुत्व आणि सैन्य भरती
दुर्गेश परुळकर

वर्ष १९२४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. आपल्या देशाची खरी ओळख हिंदू आहे. हा हिंदू समाज अहिंसेच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्या मनात शस्त्राविषयी घृणा निर्माण झाली होती. आपल्या देशाची ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा अबाधित ठेवून आपला देश स्वतंत्र करण्याचे दायित्व हिंदू समाजावर होते. अशावेळी हिंदू समाज शस्त्र त्याग करून गलितगात्र झाला होता. त्याच्यात नवचैतन्य निर्माण व्हावे आणि त्याच वेळी शस्त्रबळावर शत्रूला परास्त करून आपला देश स्वतंत्र करणे हे एकमेव ध्येय हिंदू समाजासमोर सावरकरांनी ठेवले. (Veer Savarkar)

दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी इंग्रजांच्या सैन्यात हिंदूंचे संख्याबळ कमी होते. इंग्रज सरकारला हिंदुस्थानवर राज्य करायचे असेल तर सैन्य भरती करणे अपरिहार्य होते. ही सैन्य भरती करण्यासाठी हिंदुस्थानातील तरुणांना इंग्रजी सैन्यात प्रवेश देणे ब्रिटिश सरकारला क्रमप्राप्त आहे. हे सावरकरांनी त्यावेळी जाणले आणि आपल्या देशातल्या हिंदू तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले.

(हेही वाचा – Bomb Threat in Mumbai : हॉटेल ताज आणि विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी)

सैन्यात हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा लाभ हिंदु राष्ट्राला होणार आहे. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात हिंदू तरुणांनी इंग्रजांच्या सैन्यात प्रवेश केला तर इंग्रजांना हिंदू तरुणांना लष्करी शिक्षण देणे भाग पडणार आहे. हे सावरकरांनी ओळखले. म्हणून सावरकरांनी हिंदू तरुणांना सैन्यात प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यावेळी सावरकर हिंदू तरुणांना म्हणाले, ‘आज इंग्रज सरकार संकटात सापडले आहे. शत्रूवर आलेली आपत्ती म्हणजे आपल्याला विजय संपादन करण्यासाठी प्राप्त झालेली संधी आहे. आपण त्याचा लाभ उठवला पाहिजे. हिंदू तरुणांनी सैन्यात भरती होऊन सर्व लष्करी शिक्षण संपादन करावे. ब्रिटिश सरकार स्वतःच्या हाताने तुमच्या हातात शस्त्रास्त्रे देईल.‌ सैनिकी शिक्षण तुम्ही संपादन करा. तसेच तुम्हाला युद्धाचा प्रत्यक्ष अनुभवही प्राप्त होणार आहे.‌ ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे.‌ तुमचा युद्धाचा अनुभव आपल्या देशासाठी लाभदायक ठरणार आहे. या युद्धात प्रत्यक्ष लढत असताना जेव्हा योग्य संधी येईल त्यावेळी ब्रिटिश सरकारनेच तुमच्या हातात दिलेले शस्त्र ब्रिटिशांच्या नरड्याला लावा आणि आपला देश स्वतंत्र करा.’

सावरकरांची ही रणनीती हिंदुत्वाचा जागर करणारी होती. कोणत्याही परिस्थितीत हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर या स्वतंत्र हिंदुस्थानचे स्वामित्व हिंदू समाजाकडेच राहिले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो असे म्हणता येईल. मुसलमानांचा अनुनय करणाऱ्या काँग्रेसला इंग्रजांची सत्ता जाऊन मुसलमानांची सत्ता या देशात प्रस्थापित झाली तरी ते आपल्या देशाचे स्वातंत्र्य आहे असे वाटत होते.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : ‘अब की बार…४०० पार’ घोषणेचा फटका बसला; काय म्हणाले भुजबळ)

हिंदुत्वाचा अभिमान बाळगणाऱ्या सावरकरांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यासाठी सावरकरांनी पराकाष्ठेचा प्रयत्न करून हिंदू तरुणांना सैन्यात भरती होण्यास सांगितले. हिंदू तरुणांनी सावरकरांनी दिलेला मंत्र तंतोतंत पाळला. सुयोग्य संधी येताच ब्रिटिशांच्या सैन्यात प्रवेश घेतलेल्या हिंदू सैनिकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध शस्त्र उपसले आणि आपला देश स्वतंत्र केला.‌ एवढेच नाही तर सैन्यात हिंदूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

लष्करातील हिंदू सैनिक ब्रिटिश सत्तेशी प्रामाणिक राहिले नाही म्हणून आम्हाला हिंदुस्थानातील आमची सत्ता विसर्जित करणे भाग पडते आहे. असे ब्रिटिश सरकारला मान्य करावे लागले.

तसेच काँग्रेस विभाजनाला अनुमती देणार याची सावरकरांना खात्री होती. अशावेळी देशातल्या यादवीला सामोरे जाण्यासाठी आपले हक्काचे सैन्य आपल्यापाशी असले पाहिजे. तरच या देशाचे स्वामित्व आपल्याकडे राहील अन्यथा हा देश इस्लामच्या हाती पडेल. असे घडू नये म्हणून सावरकरांनी हिंदू तरुणांना सैन्यात भरती होण्यास सांगितले. अशा प्रकारे सावरकरांनी आपल्या हिंदुत्वाच्या विचारधारेच्या बळावर देश स्वतंत्र केला. हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. (Veer Savarkar)

( लेखक वीर सावरकर अभ्यासक आणि व्याख्याते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.