WFI Election : कुस्ती फेडरेशनची निवडणूक संजय सिंग यांनी लढू नये म्हणून बजरंग, साक्षी यांचं क्रीडामंत्र्यांना साकडं 

कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या बाजूने असलेल्या कुठल्याही अधिकाऱ्याला कार्यकारिणीची निवडणूक लढता येऊ नये यासाठी बजरंग आणि साक्षीने क्रीडामंत्र्यांची भेट घेतली

159
WFI Election : कुस्ती फेडरेशनची निवडणूक संजय सिंग यांनी लढू नये म्हणून बजरंग, साक्षी यांचं क्रीडामंत्र्यांना साकडं 
WFI Election : कुस्ती फेडरेशनची निवडणूक संजय सिंग यांनी लढू नये म्हणून बजरंग, साक्षी यांचं क्रीडामंत्र्यांना साकडं 

ऋजुता लुकतुके

कुस्ती फेडरेशनच्या (WFI Election) बहुचर्चित निवडणुका येत्या २१ डिसेंबरला होणार आहेत. फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात काही महिला कुस्तीपटूंनी विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. ब्रिजभूषण यांच्या विरोधात काही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्तीपटू मग जंतर मंतर इथं उपोषणालाही बसले होते.

तेव्हा चंदिगड कुस्ती संघटनेनं कोर्टाकडून स्थगिती आणल्यामुळे ऑगस्ट महिन्यात फेडरेशनची निवडणूक होऊ शकली नव्हती. आता डिसेंबरच्या २१ तारखेला ही निवडणूक होणार आहे. आणि यापूर्वी उपोषणाला बसलेल्या कुस्तीपटूंना शरण यांचा पाठिंबा असलेले कुणीही पदाधिकारी या निवडणुकीत नसावे असं वाटतं. त्यामुळे या खेळाडूंचा शरण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंग यांनाही विरोध आहे.

(हेही वाचा-Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेबाबत भूमिका बदलल्याची अजित पवारांची कबुली)

त्यामुळे सिंग यांना निवडणूक लढवायला देऊ नये या विनंतीसाठी ऑलिम्पिक पदकविजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली.

खेळाडूंनी आपलं उपोषण सोडलं तेव्हा ब्रिजभूषण यांच्या जवळचे कुणी ही निवडणूक लढणार नाहीत, असं आश्वासन त्यांना देण्यात आलें होतं, असं या खेळाडूंचं म्हणणं आहे. त्या बोलीवरच त्यांनी उपोषण (WFI Election) सोडलं होतं. पण, सध्या अध्यक्षपदाच्या रिंगणात असलेले संजय सिंग हे ब्रिजभूषण यांचा उजवा हात मानले जातात. आणि त्यांचा मुकाबला २०१० च्या राष्ट्रकूल सुवर्ण विजेत्या अनिता शेरॉन यांच्याशी आहे.

‘आम्ही काही कुस्तीपटू क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना भेटलो. सरकारने उपोषणाला बसलेल्या खेळाडूंना दिलेल्या वचनाची आठवण आम्ही त्यांना करून दिली. फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून आमचा पाठिंबा माजी खेळाडूला असेल. संजय सिंग यांना निवडणूक लढवायला दिली जाऊ नये अशी आमची मागणी आहे. ती मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू,’ असं बजरंग यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

ब्रिजभूषण यांच्या विरोधात खेळाडूंनी केलेल्या विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणार अनिता शेरॉन या साक्षीदार आहेत. आणि आंदोलनकर्त्या खेळाडूंचा पाठिंबा त्यांनाच आहे. पण, देशातील २ संघटना सोडता इतर संघटनांचा पाठिंबा ब्रिजभूषण शरण यांना आहे. त्यामुळे त्यांची मतं संजय सिंगना जाऊ शकतात.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.