IND vs WI T20I : पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा धुव्वा, विंडिजने जिंकली मालिका

विंडिज संघाने अठराव्या षटकातच हा सामना लीलया जिंकला

115
IND vs WI T20I : पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा धुव्वा, विंडिजने जिंकली मालिका
IND vs WI T20I : पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा धुव्वा, विंडिजने जिंकली मालिका
  • ऋजुता लुकतुके

विंडिज संघाने पाचव्या टी-२० सामन्यात भारतावर ८ गडी राखून मात करत ही मालिकाही ३-२ अशी खिशात टाकली. भारता विरुद्धचा हा त्यांचा पहिलाच टी-२० मालिका विजय आहे. फ्लोरिडामध्ये शनिवारचा (१२ ऑगस्ट) दिवस भारतीय संघाचा होता. तर रविवारचा (१३ ऑगस्ट) दिवस विंडिजचा होता असंच म्हणावं लागेल. कारण, आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत विंडिज संघाने अठराव्या षटकातच हा सामना लीलया जिंकला.

फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात संघाने भारतापेक्षा सरस कामगिरी केली. आणि त्याच्या जोरावर टी-२० क्रमवारीत अव्वल असलेल्या संघाला नमवण्याबरोबरच भारताविरुद्ध पहिलीच टी-२० मालिका जिंकण्याची कामगिरीही रोमारोव्ह पॉवेलच्या या संघाने केली. भारतीय संघाने समोर ठेवलेलं १६६ धावांचं आव्हान निकोलस पुरन आणि ब्रँडन किंग्ज यांनी अगदी छोटं करून टाकलं. दोघांचा चौकारांपेक्षा षटकारांवर विश्वास जास्त होता. किंगने ६ तर पुरनने ४ षटकार ठोकले. महत्त्वाचं म्हणजे कुलदीप, अक्षर आणि यजुवेंद्र या भारताच्या फिरकी त्रिकुटालाही त्यांनी नाही सोडलं.

खरंतर सामन्यात विंडिज फलंदाजी सुरू असताना किमान चार वेळा पावसाचा व्यत्यय आला. खेळपट्टी कालच्या तुलनेत संथ होती. आणि भारतीय कर्णधार हार्दिक पटेलने त्यांच्याविरोधात तब्बल पाच फिरकी गोलंदाज वापरले. पण, यातल्या एकाही गोष्टीला विंडिजच्या एकाही फलंदाजाने जुमानले नाही.

शेफर्डची प्रभावी गोलंदाजी – 

खरंतर विंडिज संघासाठी चांगली सुरुवात गोलंदाजांनी करून दिली. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने पहिली फलंदाजी घेतली. पण, यावेळी अकील हुसेन, रोमारिओ शेफर्ड आणि जेसन होल्डर यांनी रणनितीसह गोलंदाजी केली. खासकरून पहिलंच षटक टाकणाऱ्या अकीलने चेंडू अचूक टप्प्यावर पण, संथ गतीने टाकत भारतीय फलंदाजांना नैसर्गिक फटकेबाजी करू दिली नाही.

त्यामुळेच यशस्वी जयसवाल ५ धावांवर बाद झाला. शुभमन गिलला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. पण, त्यानेही पायचीतच्या निर्णयाविरोधात टीव्ही अंपायरकडे दाद मागण्याचं टाळलं. भारतासाठी जी काही भागिदारी झाली ती ४९ धावांची सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांच्यामध्ये. तिलकने २७ धावा केल्या. पण, तो बाद झाल्यावर भारतीय फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. सूर्यकुमारने ४५ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्यामुळे भारताने निदान दीडशेचा टप्पा ओलांडला. आणि अक्षर पटेलने शेवटच्या षटकात षटकार ठोकत १६५ ची धावसंख्या गाठून दिली.

सूर्यकुमारलाही आखूड टप्प्याचे चेंडू टाकत शेफर्ड आणि होल्डर यांनी बेजार केलं होतं. ऑफला नेहमीचे फटके खेळण्याची मुभा त्याला मिळालीच नाही. आणि तिथेच सामन्याची दिशा स्पष्ट झाली. शिवाय दुसऱ्या बाजूने संजू सॅमसन, हार्दिक हे झटपट बाद झाल्याने भारतीय फलंदाजी आज कालच्यासारखी बहरली नाही.

(हेही वाचा – Khalistani : कॅनडात पुन्हा एकदा मंदिराची तोडफोड; खलिस्तानी पोस्टर्स लावले)

विंडिज डावात १२ षटकार –

विंडिज संघासाठी रोमारियो शेफर्ड ३१ धावांत ४ बळी घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. भारतीय डावात संथ वाटणारी खेळपट्टी विंडिज डावात मात्र विमाचा रनवे झाली. म्हणजे ब्रँडन किंग आणि निकोलस पुरनच्या फलंदाजीमुळे तसं वाटायला लागलं. एकतर पावसामुळे फिरकी त्रिकुटाला चेंडूवर नियंत्रण मिळवणं कठीण जात होत.

आणि आज विंडिज फलंदाज त्यांना खेळण्याची पूर्वतयारीही करून आले होते. त्यांच्या खेळात आत्मविश्वासपूर्ण आक्रमकता होती. किंगने ५५ चेंडूत ८५ धावा केल्या. तर पुरन ३५ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी भारतीय गोलंदाज यजुवेंद्र चहलला आज ६ षटकारांचा मार बसला. इथंच विंडिज फलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं.

शे होप २२ धावांवर नाबाद राहिला. रोमारियो शेफर्डला सामनावीर तर निकोलस पुरनला मालिकावीर पुरस्कार मिळाला. भारतीय संघ आता आयर्लंड विरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.