Virat Kohli : भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचं श्रेय विराट कोहलीने दिलं ‘या’ दोघांना 

Virat Kohli : तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराटने १५,००० च्या वर आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

72
Virat Kohli : भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचं श्रेय विराट कोहलीने दिलं 'या' दोघांना 
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक विराट कोहली (Virat Kohli) मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २७,५९९ धावा आहेत. त्यातील १५,३०३ धावा या तिसऱ्या क्रमांकावर केलेल्या आहेत. खासकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटचं तिसरं स्थान अढळ आहे. अलीकडेच मयंती लँगरशी एका मुलाखतीत बोलताना विराटने तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचं श्रेय त्याचा पहिला कर्णधार आणि तेव्हाचा मुख्य प्रशिक्षक यांना दिलं.

‘माझा माझ्या फलंदाजीविषयीचा दृष्टीकोन अत्यंत वास्तववादी होता. मी माझ्यापेक्षा चांगलं खेळणाऱ्या अनेकांना अवती भवती पाहत होतो. माझी फलंदाजी त्यांच्या इतकी चांगली नव्हती. पण, माझ्याकडे दृढ निश्चय होता आणि मी संघासाठी काहीही करायला तयार होतो. संघाला विजयी करण्यासाठी काहीही करायला मी तयार होतो आणि तेव्हा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला सांगितलं. मला त्यासाठी पाठिंबा देऊ केला. माझी ऊर्जा, संघासाठी समरसता याची कदर त्यांना होती. त्यांच्यामुळेच मला हे यश मिळालं,’ असं विराट (Virat Kohli) नम्रपणे म्हणाला.

(हेही वाचा – भारतात युद्धाच्या अटकळात जारी करण्यात आलेला NOTAM म्हणजे काय?)

आपल्याकडे कुणीही सामना जिंकून देणारा म्हणून पाहिलं नाही. पण, मी लढत राहीन आणि शेवटपर्यंत लढेन याची खात्री मला आणि या दोघांनाही होती, असं विराटने (Virat Kohli) पुढे सांगितलं. ‘माझा खेळ हळू हळू सुधारत गेला. मी घडत गेलो. मला शिकण्याची आस होती. माझ्यात सुधारणा घडवून आणायची होती. मला सर्वोत्तम खेळाडू व्हायचं होतं आणि मला सर्वोत्तम कामगिरी करायची होती,’ असं विराटने एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं.

(हेही वाचा – Suspend : प्रोटोकॉल पाळला नाही; वरळीचे सिनियर पीआय निलंबित)

३६ वर्षीय विराटने (Virat Kohli) आपल्या वयाची निम्मी वर्षं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या एकाच फ्रँचाईजीबरोबर काढली आहेत. आयपीएलमध्ये हा एक विक्रम आहे. जागतिक स्तरावरही स्टिव्हन गेराड, फ्रान्सिस्को तोटी यासारखे मोजकेच खेळाडू असे आहेत, जे लीगमध्ये फक्त एकाच संघातून अख्खी कारकीर्द खेळले. यावर विराटने इतर फ्रँचाईजींकडूनही विचारणा झाल्याचं मान्य केलं. काही वेळा तो विचार डोकावल्याचंही तो म्हणाला. ‘माझ्यावर लोकांचं अती लक्ष होतं, तेव्हा सगळ्या प्रकारचे विचार मनात येऊन गेले. मी फलंदाजी करत नसेन तर माझ्या नेतृत्वाक़डे लोकांचं लक्ष होतं. मी नेतृत्व करत नसेन तर फलंदाजीवर लक्ष होतं. मी मोकळेपणाने काहीही करू शकत नव्हतो. तेव्हा सगळ्या प्रकारचे विचार आले. पण, बंगळुरू फ्रँचाईजीने दिलेला पाठिंबा विसरू शकत नव्हतो. त्यामुळे इथेच राहिलो,’ असं शेवटी विराट म्हणाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.