-
ऋजुता लुकतुके
अखेर विराट कोहलीच्या निवृत्तीची चर्चा खरी ठरली आहे. त्याचबरोबर १४ वर्षांच्या कारकीर्दीचा शेवट झाला आहे. इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी संघ निवड काही दिवसांवर आलेली असताना विराटने आपला निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात आता भारतीय संघ रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय खेळताना दिसेल. सोशल मीडियावर आपला हा निर्णय जाहीर करताना विराट म्हणतो, ‘निळी कॅप डोक्यावर चढवली त्या गोष्टीला पंधरा वर्षं झाली. माझा प्रवास इतका चांगला होईल, हे तेव्हा माहीतही नव्हतं. या काळात मला अनेकदा परीक्षा द्यावी लागली. मी इथेच घडलो. मला अनेक धडे मिळाले आणि ते आयुष्यभर माझ्याबरोबर राहतील.’ (Virat Kohli Retires)
विराटने इन्स्टाग्राम खात्यावर हा संदेश लिहून आपली निवृत्ती जाहीर केली. ‘कसोटी खेळणं हा अनुभव अतिशय विलक्षण आहे. लोकांना दिसत नाही असे क्षण त्यात असतात. पण, ते तुम्ही जगत असता आणि त्यातच आनंद असतो,’ असं पुढे विराट म्हणतो. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – Operation Sindoor : देशातील ३२ विमानतळावरून नागरी उड्डाण पुन्हा सुरू, प्राधिकरणाकडून निवेदन जारी)
View this post on Instagram
‘मी कसोटीला अलविदा करत असताना हे फार सोपं नाही हे मला ठाऊक आहे. पण, हेच योग्य आहे. मी कसोटी क्रिकेटला माझ्यातील सर्वकाही दिलं आहे आणि मला जे परत मिळालं, ते त्याहून कित्येक पट जास्त आहे. मी कसोटी सोडताना अनेकांचा ऋणी आहे. हा खेळ, माझ्याबरोबर असलेले लोक सगळ्यांचा मी ऋणी आहे,’ असं विराट या संदेशात म्हणतो. (Virat Kohli Retires)
काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मानेही कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्या पाठोपाठ काही दिवसांतच विराटच्या निवृत्तीची बातमी आली आहे. त्यामुळे यामध्ये काही संगती असल्याची चर्चा भारतीय क्रिकेटमध्ये सुरू झाली आहे. आता इंग्लंड दौऱ्यापासून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं नवीन चक्र सुरू होणार आहे. यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली भारतीय संघात नसतील. आघाडी आणि मधल्या फळीत त्यामुळे नवीन भारतीय संघ पाहायला मिळेल. आतापर्यंत १२३ कसोटींत विराटने ९,२३० धावा केल्या आहेत. यात ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं आहेत. विराट हा भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे आणि ६८ कसोटींपैकी ४० कसोटींत भारताने विजय मिळवला आहे. २०१६ ते २०१९ दरम्यान विराट सर्वाधिक फॉर्मात होता. ४३ सामन्यांत त्याने ६६ धावांच्या सरासरीने ४,२०८ धावा केल्या होत्या. (Virat Kohli Retires)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community