Asia Cup : आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड २० ऑगस्टला?

यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचं संघातील स्थान धोक्यात आहे

114
Asia Cup : आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड २० ऑगस्टला?
Asia Cup : आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड २० ऑगस्टला?
  • ऋजुता लुकतुके

या महिना अखेरीस होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड रविवारी २० ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. आणि यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचं संघातील स्थान धोक्यात आहे. विंडिज दौऱ्यात भारतीय संघाला ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. आणि या अपयशात मधल्या फळीतील फलंदाजांचं अपयश उठून दिसलं. यातलाच एक होता यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन. टी-२० मालिकेत त्याने अनुक्रमे १२,७ आणि १३ धावा केल्या. तर एकदिवसीय मालिकेत ९ आणि ५१ धावा त्याला करता आल्या.

एकमेव अर्धशतकाखेरीज त्याची कामगिरी सुमार होती. त्यामुळे आशिया चषकासाठी संघ निवड होताना संजू सॅमसनचा विचार होणं थोडं कठीण आहे. दुसरीकडे आयर्लंड दौऱ्यातही संजू सॅमसनला आव्हान असेल ते जितेश शर्माचं. डब्लिनमध्ये होणारे हे सामने १८, २० आणि २३ ऑगस्टला होणार आहेत. तर आशिया संघासाठीची निवड २० तारखेला होण्याची दाट शक्यता आहे. आशिया चषकातील सामन्यांना ३० ऑगस्टपासून मुलतानमध्ये सुरुवात होत आहे. आणि भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान दरम्यान २ सप्टेंबरला श्रीलंकेत पल्लिकल इथं होणार आहे. सध्या अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती फक्त आशिया चषकासाठीच संघ निवडेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी संजू सॅमसन खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांत त्याची कामगिरी चांगली आहे. आणि १३ सामन्यांत त्याने ५५.७१ धावांची सरासरी राखली आहे. पण, के एल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात परतण्याची आशा आहे. शिवाय तिलक वर्माने फलंदाज म्हणून आणि जितेश शर्माने यष्टीरक्षक म्हणून त्याच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. त्याचबरोबर विंडिज दौऱ्यात तेज गोलंदाजही अपयशी ठरले होते. त्यामुळे जसप्रीत बुमराच्या पुनरागमनाबरोबरच प्रसिध कृष्णालाही गोलंदाज म्हणून संधी मिळू शकते. प्रसिध २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात झिंबाब्वेविरुद्ध शेवटचं खेळला होता. त्यानंतर हाड दुखावल्यामुळे तो मैदानाबाहेर आहे. पण, आता तंदुरुस्त आहे.

(हेही वाचा – DRDO Former Director : डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. अरुणाचलम यांचे निधन)

राहुल-श्रेयस यांच्या तंदुरुस्तीचा अपडेट काय?

मूळात आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड रखडली आहे. बाकीच्या संघांनी आपले संघही जाहीर केले आहेत. पण, भारतीय निवड समितीला के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना तंदुरुस्त होण्यासाठी अवधी द्यायचा होता. दोघं सध्या बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत सराव करत आहेत.

अलीकडेच दोघांनी मॅच सिम्युलेटरवर सराव केल्याचा व्हीडिओही बाहेर आला होता. पण, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पूर्वीच स्पष्ट केल्यानुसार, दोन्ही खेळाडू सलग ५० षटकं मैदानावर घालवण्या इतके तंदुरुस्त नसतील तर त्यांचा विचार होणार नाहीए. आणि के एल राहुलकडून तर निवड समितीला ५० षटकं यष्टीरक्षणाचीही अपेक्षा आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, के एल राहुल १०० टक्के तंदुरुस्त आहे. आणि फलंदाजीचा जोरदार सरावही करतोय. तर श्रेयस अय्यर अजून १०० टक्के तंदुरुस्त नाही. पण, त्या वाटेवर आहे. या दोघांबद्दल निवड समिती काय निर्णय घेते हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजमधून परतलेल्या भारतीय खेळाडूंनाही बंगळुरूत येऊन आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.