-
ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup 2024) आपली मोहीम सुरू करण्यापूर्वी फक्त एकच सराव सामना खेळणार आहे. एरवी आयीसीच्या कुठल्याही महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी बाहेरून आलेला संघ किमान दोन सराव सामने खेळतो. तसा प्रघातच आहे. असं असताना भारतीय संघ एकच सामना का खेळतोय, यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघ ५ तारखेला आयर्लंडबरोबर आपला पहिला सामना खेळणार आहे. आणि भारताचे चारही साखळी सामने हे न्यूयॉर्कमध्ये आहेत.
त्यामुळे बीसीसीआयनेच भारतीय संघाचे सराव सामनेही न्यूयॉर्कमध्येच ठेवावेत अशी विनंती आयोजकांना केली होती. कारण, खेळाडूंची अमेरिकेत फारसा प्रवास करण्याची इच्छा नव्हती. आणि आयोजकांनी संघाचा एखादा सराव सामना फ्लोरिडा इथं भरवण्याची तयारी दाखवली होती, अशी बातमी क्रिकबझ या वेबसाईटने दिली आहे. आयसीसी आणि क्रिकेट वेस्ट इंडिजनेही फ्लोरिडा इथं भारतीय संघाचा सामना खेळवण्याची तयारी चालवली होती.
(हेही वाचा – आसामला पाकिस्तानात नेण्याचा डाव उलथवून टाकणारे महान आदिवासी नेते Bhimbor Deori)
भारतीय संघाचा सराव सामनाही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. २०१५ च्या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सराव सामनाही प्रेक्षकांची गर्दी खेचून गेला होता. या सामन्याचं टेलिव्हिजन प्रसारणही झालं होतं. त्यामुळे भारतीय संघाच्या सामन्यांना आयोजकांची मागणी असते. पण, यावेळी भारतीय संघ आयपीएलचा थकवणारा हंगाम खेळून अमेरिकेचा लांबचा प्रवास करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयनेही न्यूयॉर्क सोडून इतर कुठे जाणं टाळण्याचं ठरवलं आहे. (T20 World Cup 2024)
आयसीसीने अजून सराव सामन्यांचं वेळापत्रक ठरवलेलं नाही. आणि १ तारखेला स्पर्धा सुरू होत असल्यामुळे सराव सामने हे २५ आणि २६ मे ला होतील, असं दिसतंय. भारतीय संघातील काही खेळाडू हे २६ मे पर्यंत आयपीएलमध्ये व्यस्त असतील. त्यामुळे आयपीएलचं वेळापत्रक सांभाळून भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेत पोहोचेल अशी व्यवस्था बीसीसीआय करणार आहे. ज्या खेळाडूंचं आयपीएलमधील आव्हान संपलेलं आहे, ते खेळाडू पहिल्या फळीत २२ नंतर अमेरिकेला पोहोचू शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community