-
ऋजुता लुकतुके
२०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहलीने कसोटीत पदार्पण केलं तेव्हा आंतरराष्ट्रीय कसोटी स्पर्धा म्हणजे काय त्याला पहिल्यांदा कळलं. तो स्वत:च तेव्हा म्हणाला होता, ‘मला वाटलेलं तितकं हे सोपं नाही. दिवसभर उसळत्या चेंडूचा मारा झेलणं म्हणजे काय मी पाहतोय!’ पण, हे जेव्हा तो पत्रकारांना सांगत होता, तेव्हाच त्याचं पुढचं वाक्य त्याने उच्चारलं नाही तरी असं होतं, ‘पण, मी सोडणार नाही. मी तग धरणारच.’ ज्यांनी विराट कोहलीला घडताना पाहिलंय अशा अनेक क्रीडा पत्रकारांनी विराटच्या याच स्वभावाचं कौतुक केलं आहे. आव्हान सगळ्यात आधी ओळखणं, त्याला थेट भिडणं आणि स्वत:त बदल करण्याची लवचिकता बाणवणं.
भारतीय क्रिकेटमध्ये त्याचं कौतुक होतच होतं आणि उगवता तारा म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. अशावेळी संघातील सचिन आणि सेहवाग सारख्या खेळाडूंनी दिलेला सल्लाच त्याने ऐकला. ‘आयपीएल तुला खुणावेल. पण, ते फक्त तात्पुरतं असेल. खरं यश कसोटी क्रिकेटमध्ये आहे हे विसरू नकोस,’ असं सेहवाग त्याला दिल्लीत म्हणाला होता आणि विराटनेही त्याला वचन दिलं की, तो कसोटीला देव मानेल. हे वचन त्याने पाळलं. (Rohit – Virat Retirement)
(हेही वाचा – Solapur मध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; आठ जणांचा होरपळून मृत्यू)
२०१४ ते २०१९ या काळात त्याने जे शिखर गाठले, जे फार थोडे त्याच्या काळातील क्रिकेटपटू गाठू शकले. त्या काळात त्याच्या बॅटमधून धावा आणि शतके झऱ्यासारखी वाहत होती. त्याच्या फलंदाजीतील कलाकारीने भारतीय संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. २०२० नंतर रोहित शर्मा कसोटीतील मागची ५ वर्षं आपलं नेतृत्व आणि जादूई सलामीने भरून काढली. ही जोडी कसोटी संघाचा आधारस्तंभ बनली. आता या दोघांच्या नंतर काही नवोदित फलंदाजांसाठीही हीच एक प्रेरणादायक मार्गदर्शक कहाणी आहे. खास करून कोहली आणि रोहित शर्मा यांच्या युगानंतर भारतीय क्रिकेटचे नेतृत्व करण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे.
विराट, रोहित यांनी कसोटी क्रिकेटवर प्रेम केलं, ते वाढवलं आणि आपलं सर्वस्व या प्रकाराला दिलं. आता त्यांची जागा घेऊ शकतील असे ताज्या दमाचे भारतातील खेळाडू पाहूया,
शुभमन गिल
‘नेक्स्ट जनरेशन’ स्टार्सपैकी शुभमन गिल याला सर्वात महत्त्वाची भूमिका दिली जात आहे. तो भविष्यातील भारताचा प्रमुख फलंदाज आणि कसोटी कर्णधार ठरू शकतो.
कदाचित हे योगायोग असावा, पण गिल आज २५व्या वर्षी कोहली जिथे होता, त्याच टप्प्यावर आहे, मध्यम दर्जाची कसोटी कामगिरी.
गिलने आतापर्यंत ३२ टेस्टमध्ये १८९३ धावा केल्या असून त्याची सरासरी ३५ आहे. आता तो इंग्लंडमध्ये जात आहे, जिथे त्याची कामगिरी फारशी चांगली नाही. तीन टेस्टमध्ये केवळ ८८ धावा, सरासरी १४.६६.
कोहलीसारखं गिलही त्याचे नशीब इंग्लंडमध्ये बदलू शकेल का? जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड नसले तरी इंग्लंडकडे सक्षम वेगवान गोलंदाज आहेतच. त्याला कोहलीसारखेच कठोर शिस्तबद्ध फलंदाजी कौशल्य आणि चेंडूला जवळ जाऊन खेळण्याची सवय अंगिकारावी लागेल. (Rohit – Virat Retirement)
(हेही वाचा – ‘तो सूड नव्हता तर…’; Operation Sindoor बाबत भारतीय सैन्याचा नवा व्हिडिओ समोर)
यशस्वी जयस्वाल
यशस्वी जयस्वाल इंग्लंड दौऱ्यात सलामीला खेळणार हे निश्चित आहे. तो आधीच वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतात हे काम करत आला आहे. पण इंग्लंडमध्ये हे काम अधिक कठीण असेल. त्याने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये अनुक्रमे ४४ आणि ८०च्या सरासरीने धावा करत संयम आणि तंत्र दाखवले आहे.
पण इंग्लंडमध्ये उशिरा स्विंग होणाऱ्या चेंडूंपुढे त्याच्यासाठी अधिक आव्हान असेल. त्याच्या आक्रमक ड्राईव्ह आणि कट्स थांबवून त्याला संयम आणि योग्य क्षणी हल्ला करण्याची मानसिकता स्वीकारावी लागेल.
हा तांत्रिक नव्हे तर मानसिक बदल आहे आणि कोहलीने २०१४ नंतर २०१८ मध्ये जसा बदल केला, तसा.
ध्रुव जुरेल
२४ वर्षांचा जुरेल, ऋषभ पंतच्या पाठोपाठ दुसरा विकेटकीपर फलंदाज म्हणून मजबूत पर्याय आहे. इंग्लंडविरुद्ध पदार्पणात त्याने प्रभाव टाकला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध तसा परिणाम झाला नाही. त्याच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता आहे. त्याने बोर्डर-गावस्कर मालिकेआधी एका अनौपचारिक टेस्टमध्ये दोन अर्धशतके करत फलंदाजीत संतुलन दाखवले.
गौतम गंभीरला जसे खेळाडू आवडतात, झुंजार, जिद्दी. तसा तो आहे. पण सातत्य टिकवणे हीच त्याच्यासमोरील खरी कसोटी आहे. (Rohit – Virat Retirement)
(हेही वाचा – Pakistani Spy : पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या अरमानला हरियाणाच्या नूंहमध्ये अटक; ISIला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप)
बी साई सुदर्शन
तंत्रावर विश्वास असलेला साई सुदर्शन इंग्लंड दौऱ्यात निवडला जाण्याची शक्यता आहे. त्याची पारंपरिक फलंदाजी जयस्वालच्या आक्रमक शैलीला समतोल ठेवू शकते.
२३ वर्षांचा सुदर्शन स्ट्रेट बॅटने जमिनीवरून दोन्ही बाजूंनी खेळतो, जी शैली इंग्लंडमध्ये विशेष फायदेशीर ठरू शकते. त्याने काउंटी क्रिकेटमध्ये सरे संघासाठी खेळलेला अनुभव देखील त्याच्या कामी येऊ शकतो.
सर्फराझ खान
२७ वर्षांचा सर्फराझ मोठ्या दुखापतीनंतर परतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यासाठी किमान ए संघात तरी त्याची निवड पक्की असेल आणि तिथून त्याला भारतीय संघात आपली जागा बनवायची आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध बंगळुरूमध्ये त्याने १५० धावांचा रतीब घातला होता. पण, त्यानंतर दुखापतीमुळे त्याची कामगिरी खालावली. त्याच्याकडे कौशल्य आहेच, पण कोहलीप्रमाणे फिटनेससाठी झपाटून काम केल्यास तो पुन्हा आपली कसोटी कारकीर्द सावरू शकतो.
या पाच खेळाडूंशिवाय के. एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि करुण नायर हे खेळाडू संघात कायमस्वरुपी जागा मिळवण्यासाठी उत्सुक असतील. पण, हे तिघेही तिशी ओलांडलेले आहेत. त्यामुळे रोहित, विराटचे वारसदार म्हणून त्यांचा विचार केलेला नाही. इंग्लंड दौऱ्यात ते भारतीय संघाचा नक्कीच आधार असतील.
आता त्यांच्या पाठीशी कोहली किंवा रोहित शर्मा मार्गदर्शन करायला, समजवायला, झापायला नाहीत. हे तरुण आता स्वतःच्या ताकदीवर पुढे जातील का? त्यांनी झुंज दिली, प्रगल्भ झाले, तरच त्यांचं आणि भारतीय क्रिकेटचं भवितव्य उजळेल. नवीन कसोटी अजिंक्यपद चक्राची सुरुवात भारतीय संघ नवीन दमाच्या चेहऱ्यांनी करत आहे. अननुभवी खेळाडूंच्या उपस्थितीत संघाची धुरा ही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर असेल हे नक्की आणि रोहित आणि विराटचा वारसदार शोधण्याची जबाबदारीही त्याच्यावरच असेल. (Rohit – Virat Retirement)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community