
-
ऋजुता लुकतुके
यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला १८ वर्षांचा दुष्काळ संपवत आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात झालेल्या विजयोत्सवाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागलं. यात ११ लोकांचा जीव गेला. तर किमान ५४ लोक जखमी झाले. त्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि बंगळुरू फ्रँचाईजीमध्ये खळबळ माजली आहे. त्यातच एक बातमी गेले काही दिवस जोर धरत होती, ती म्हणजे, फ्रँचाईजीची मालकी असलेल्या दियाजिओ कंपनीला आता फ्रँचाईजीच विकायची आहे. (RCB Stake Sale)
डियाजिओ ही विजय माल्या यांच्या युनायटेड स्पिरिट्स कंपनीची मुख्य कंपनी आहे. ही बातमी बाजारात पसरल्यावर मंगळवारी मुख्य कंपनीचे शेअरही ३ टक्क्यांनी वाढले. पण, अखेर मंगळवारी उशिरा युनायटेड स्पिरिट्स कंपनीने फ्रँचाईजी विक्री करण्याचा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘आरसीबी फ्रँचाईजी विक्रीच्या पसरलेल्या बातम्या हे फक्त अंदाज आहेत. पण, अशा कोणत्याही वाटाघाटी सध्या सुरू नाहीत,’ असं युनायटेड स्पिरिट्सने बीएसई शेअर बाजारात सादर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (RCB Stake Sale)
(हेही वाचा – World Test Championship : कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड?)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही आयपीएलमधील एक लोकप्रिय फ्रँचाईजी आहे. विजेतेपद पटकावण्यापूर्वीत या फ्रँचाईजीचं मूल्यांकन १७,००० कोटींवर पोहोचलं होतं. त्यानंतर ही विक्रीची बातमी सगळीकडे पसरली. पण, आता युनायटेड स्पिरिट्सने ती नाकारली आहे. २००८ मध्ये आयपीएल फ्रँचाईजींची विक्री झाली तेव्हा विजय माल्या यांच्या किंगफिशर कंपनीने ही फ्रँचाईजी विकत घेतली होती. पण, किंगफिशर एअरलाईन्सला २०१२ मध्ये मोठं कर्ज झाल्यावर डियाजिओ कंपनीने या कर्जासह किंगफिशरमधील मोठी हिस्सेदारी विकत घेतली. तेव्हापासून फ्रँचाईजीची मालकीही डियाजिओ कंपनीकडे गेली आहे. (RCB Stake Sale)
डियाजिओ ही ब्रिटिश मद्यउत्पादक कंपनी आहे. त्यांची व्हिस्की प्रिमियम श्रेणीतील आहे आणि ती जगभर प्रसिद्ध आहे. एकूण १८० देशांमध्ये त्यांनी बनवलेल्या मद्याची निर्यात होते. युनायटेड स्पिरिट्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीने डियाजिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने भारतात उपकंपनी स्थापन केली आहे. तिच्याकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचाईजीचाही कारभार आहे. (RCB Stake Sale)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community