Ravi Shastri on Bumrah : इंग्लंड दौऱ्यात बुमराहला कसं वापरायचं यावर रवी शास्त्रींचा भारतीय संघाला सल्ला

Ravi Shastri on Bumrah : आयपीएल नंतर लगेचच भारतीय संघ इंग्लिश दौऱ्यावर जाणार आहे.

31
Ravi Shastri on Bumrah : इंग्लंड दौऱ्यात बुमराहला कसं वापरायचं यावर रवी शास्त्रींचा भारतीय संघाला सल्ला
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल नंतर लगेचच भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. इथे संघ पाच कसोटींची महत्त्वपूर्ण मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे भारताचे मुख्य तेज गोलंदाज असतील. या त्रिकुटावर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्वास व्यक्त केला आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंच २०२५-२७ या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होईल. भारतासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील १-३ अशा लाजिरवाण्या पराभवानंतर हा पहिला परदेश कसोटी दौरा आहे. त्यामुळे भारतासाठी या दौऱ्याला महत्त्व आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी तेज गोलंदाजांची उपलब्धता हा एक मुद्दा होता. शमी दुखापतीशी झुंजत होता. तर शेवटच्या कसोटीत बुमराहची पाठ दुखावली. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार हे इतर गोलंदाजा फारशी प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. तर आकाशदीप फलंदाज म्हणून चमकला, गोलंदाज म्हणूनही तो प्रयत्नशील होता. पण, तितकासा भेदक नव्हता. याचा परिणाम भारताच्या कामगिरीवर झाला. (Ravi Shastri on Bumrah)

पण, आता भारताचे महत्त्वाचे तीन गोलंदाज तंदुरुस्त आणि फॉर्ममध्ये असल्याचं रवी शास्त्रीला वाटतंय. मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर चॅम्पियन्स करंडकासाठी वगळण्यात आलं. पण, त्याने आयपीएलमध्ये आपला फॉर्म दाखवून दिला आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर १२ बळी आहेत. तर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनाही दुखापतीनंतर लय सापडली आहे. (Ravi Shastri on Bumrah)

(हेही वाचा – NCERT च्या पुस्तकांतून मोगलांचा इतिहास हद्दपार; भारतीय राजघराणी, महाकुंभ यांचा समावेश)

‘मला वाटतं, सिराज, बुमराह आणि शमी हे तिघंही तंदुरुस्त असतील तर इंग्लिश फलंदाजांसाठी ते नक्कीच आव्हान उभं करतील. हे त्रिकुट ही संघाची मोठी ताकद असू शकेल. सिराजला वगळल्यानंतर त्याने जे प्रत्युत्तर दिलं, ते मला जास्त आवडलं. तो दुखावला गेला आणि त्याने पुनरागमन केलं. मला हेच बघायला आवडतं,’ असं शास्त्री आयसीसी रिव्ह्यू या आपल्या कार्यक्रमात म्हणाला. अर्थात, बुमराहविषयी शास्त्रीने काळजी व्यक्त केली. ‘बुमराहला मी अगदी जपून वापरेन. एका वेळी दोन कसोटींच्या वर मी त्याचा विचार करणार नाही. आधी दोन कसोटी संपू दे. मग त्याची तंदुरुस्ती बघून पुढील निर्णय घेता येईल. किंबहुना त्याला विश्रांती लागेलच. पाच पैकी ४ कसोटी त्याला खेळवावं असं मला वाटतं,’ असं शास्त्री म्हणाला. (Ravi Shastri on Bumrah)

शमी मेहनती खेळाडू आहे आणि तो स्वत:च्या शरीराला ओळखतो, असं शास्त्री यांचं शमीविषयी मत आहे. ‘मी शमीबरोबर बराच काळ काम केलं आहे. तो इंग्लंड विरुद्ध खेळायला तयार आहे, याचा अर्थ तो तयार आहे. आता तो नेट्समध्ये कशी गोलंदाजी करतो हे पाहून त्याच्याविषयी निर्णय घ्यायला हवा,’ असं शास्त्री यांनी म्हटलं आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यानची कसोटी मालिका २० जूनला हेडिंग्ले कसोटीने सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील चार कसोटी एजबॅस्टन, ओल्ड ट्रॅफर्ड, लॉर्ड्स आणि ओव्हल इथं होणार आहेत. (Ravi Shastri on Bumrah)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.