-
ऋजुता लुकतुके
भारताचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी आशिया चषकातील पाकिस्तानच्या समावेशावरून केलेल्या विधानामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मात्र सध्या चिडले आहेत. अगदी जावेद मियांदाद आणि इंझमाम उल हक यांनीही गावस्कर यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेले संबंध पाहता, भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणाऱ्या आशिया चषकात पाकिस्तानचं खेळणं अवघड आहे,’ असं गावस्कर यांनी टीव्ही वाहिनीवर म्हटलं होतं. (Pakistan in Asia Cup)
बीसीसीआय भारत सरकारच्या निर्णयांचं पालन करतं आणि ते पाहता, पाकिस्तानचा यंदा आशिया चषकात समावेश शक्य वाटत नाही, असं गावस्कर यांनी म्हटलं होतं. अलीकडे काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताने सिंधू नदीचा जल करार स्थगित केला आहे. तर आणखीही कारवाईचे संकेत दिले आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानने दहशतवादी गटांना मदत केल्याचा भारताचा आरोप आहे. (Pakistan in Asia Cup)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : तुर्कस्तानवर आर्थिक बहिष्कार घाला; ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे कळकळीचे आवाहन)
गावस्कर यांच्या विधानावर जावेद मियांदाद म्हणतात, ‘सुनीलभाई असं म्हणाले असतील, यावर विश्वासच बसत नाही. ते इतके नम्र आणि राजकारणापासून दूर राहणारे आहेत आणि त्यांनी असं म्हणावं हे दुर्दैवी आहे.’ तर इक्बाल कासीम यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘मला आधी वाटलं गावस्कर यांचं विधान मीडियाने तोडून मोडून मांडलं असावं. पण, त्यांनी असं म्हटल्याचं पाहून मला वाईट वाटलं. दोन्ही देशांत त्यांचे चाहते आहेत. त्यांनी खेळात राजकारण आणू नये,’ असं इक्बाल कासीम म्हणाले आहेत. (Pakistan in Asia Cup)
तर माजी यष्टीरक्षक बासित अलीने कडक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. ‘हे विधान म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. काही आरोप करण्यापूर्वी त्यांनी पुरावे द्यावेत,’ असं बासित अली म्हणाला आहे. तर माजी फिरकीपटू मुश्ताक अलीने या बाबतीत लोकांनी शांत राहून संतुलित बोललं पाहिजे, असं म्हटलं आहे. पाक संघाचा सध्याचा कर्णधार मोहम्मद रिझवानने मात्र कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. ‘राजकारण काहीही असलं तरी क्रिकेट सुरू राहिलं पाहिजे, असं रिझवान म्हणाला. (Pakistan in Asia Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community