-
ऋजुता लुकतुके
२२ एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आहे. आणि या अंतर्गत ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी केंद्रांवर भारताने हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. त्याचा फटका आयपीएलला बसतोय. उत्तरेत काश्मीर, पंजाब, राजस्थान या सीमावर्ती भागात तणाव आहे. पाकिस्तानकडून गोळीबारही होत असल्यामुळे भारत सरकारने उत्तरेतील १० विमानतळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवार आणि रविवारी हिमाचल प्रदेशच्या धरमशाला इथं होणारे सामने अडचणीत आले आहेत. (Operation Sindoor)
(हेही वाचा – India Pakistan War : जैसलमेरमध्ये भारताने पाडले पाकिस्तानी एफ-१६; पायलट भारताच्या ताब्यात)
रविवारचा सामना तर अहमदाबादला हलवण्यात आला आहे. पण, गुरुवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करावा लागला. जम्मू इथं पाकिस्तानकडून मोठे स्फोट झाल्यानंतर धरमशाला इथंही वीज पुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे मैदानातील ४ कृत्रिम वीजेच्या टॉवरपैकी तीन बंद पडले. धरमशालात गुरुवारी पाऊसही होता. त्यामुळे वीज नेमकी कशामुळे खंडित झाली हे नेमकं कळलं नाही. पण, काही काळ वाट बघितल्यानंतर सामना तर रद्द झालाच. शिवाय, सुरक्षिततेच्या कारणावरून आयपीएल प्रशासनाने प्रेक्षकांना मैदानही खाली करायला सांगितलं. खेळाडूंनाही स्टेडिअममधून बाहेर काढण्यात आलं आहे. (Operation Sindoor)
(हेही वाचा – India Pakistan War : तुर्कस्तानची पाकड्यांना मदत; मध्यरात्री पाठवले मालवाहू विमान)
याच मैदानावर रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना होणार होता. पण, चंदिगड आणि अमृतसर ही नजीकची दोन्ही विमानतळं बंद असल्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ वेळेत धरमशालाला पोहोचण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे हा सामना आता अहमदाबाद इथं होणार आहे. पंजाबला मधल्या दोन दिवसांत धरमशालाहून अहमदाबादला पोहोचण्याचं आव्हान आहे. दिल्ली संघाचाही सामनाही रविवारी रात्री गुजरात टायटन्स बरोबर होणार आहे. आणि दिल्लीत होणाऱ्या या सामन्यासाठी वेळेत दिल्लीला पोहोचण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. येत्या १० तारखेपर्यंत उत्तर भारतातील चंदिगड, अमृतसर, राजकोट, जोधपूर, जामनगर, पठाणकोट, भूज, श्रीनगर, लेह आणि जम्मू ही विमानतळं बंद राहणार आहेत. (Operation Sindoor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community