-
ऋजुता लुकतुके
आयपीएल (IPL) सुरू असताना भारतीय क्रिकेटमध्ये रविवारी एक वेगळंच नाट्य सुरू होतं. हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनने अचानक राजीव गांधी स्टेडिअमच्या (Rajiv Gandhi Stadium) एका स्टँडला दिलेलं मोहम्मद अझहरुद्दीनचं नाव हटवण्याचा निर्णय जाहीर केला. हैद्राबाद असोसिएशनच्या मालकीच्या या स्टेडिअममध्ये उत्तरेला हा स्टँड आहे. पण, असोसिएशनचा एक सदस्य क्लब असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट क्लबने हे नाव नैतिकतेच्या कारणावरून हटवण्याची मागणी केली होती. ‘अझहरुद्दीनने २०१९ मध्ये असोसिएशनचा अध्यक्ष असताना अधिकाराचा गैरवापर करत आपलं नाव एका स्टँडला दिलं,’ असं क्लबने केलेल्या याचिकेत म्हटलं होतं.
त्यानंतर हैद्राबाद असोसिएशनने नैतिकता पालन समितीकडे हे प्रकरण सोपवलं. आणि हैद्राबाद उच्च न्यायालयाचे (High Court) निवृत्त न्यायाधीश जस्टिस ईश्वरय्या यांच्याकडे लोकपाल म्हणून सुनावणी वर्ग केली. ईश्वरय्या असोसिएशनचे नैतिकता पालन अधिकारीही आहेत. अझहरुद्दीन यांनी स्टँडला आपलं नाव देताना कार्यकारिणीचं मत विचारात घेतलं नाही, असं क्लबचं म्हणणं होतं.
(हेही वाचा – Indian army : आता सियाचीनमध्येही थेट 5 जी नेटवर्क ; सैनिकांना कुटुंबीयांशी बोलता येणार !)
त्यावर ईश्वरय्या यांनी चौकशी करून अझहरुद्दीनचं नाव स्टँडवरून हटवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे अझहरुद्दीन नाराज झाला आहे. या निर्णयाविरुद्ध हैद्राबाद उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं त्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं. ‘भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचं नाव स्टँडवरून काढून टाकलं जातं, हे अवमानकारक आहे. शिवाय यात तांत्रिक चूकही आहे. ईश्वरय्या यांची मुदत संपलेली असताना त्यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. त्यामुळे त्यांचा निर्णय रद्द होऊन स्टँडला माझे नाव कायम राहावे असं अपील मी करणार आहे,’ असं अझहरुद्दीन म्हणाला.
अझहरुद्दीन २०१९ ते २०२३ या कालावधीत हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता. या कालावधीत त्याने व्ही व्ही एस लक्ष्मणचं (VVS Laxman) नाव स्टँडवरून काढून टाकलं असाही आरोप त्याच्यावर आहे. त्याचंही अझहरुद्दीनने खंडन केलं आहे. पॅव्हेलियनला अजूनही लक्ष्मणचं नाव असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community