IPL 2024 Final: दशकाच्या प्रतीक्षेनंतर कोलकाता नाईट रायडर्स ठरला आयपीएल विजेता

106

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२४ चा (IPL final 2024) चॅम्पियन संघ ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव करत मोठा विजय नोंदवला. हैदराबादने केकेआरला विजयासाठी अवघ्या ११४ धावांचे सोपे आव्हान दिले होते. कोलकाता संघाने हे आव्हान सहज गाठले. व्यंकटेश अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाजच्या ९१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर झटपट धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार लगावत ५२ धावा केल्या तर आंद्रे रसेलने ३ विकेट्स घेत चेंडूने चांगली कामगिरी केली. तर केकेआरच्या गोलंदाजांनी अंतिम सामन्यात चेंडूने हाहाकार केला.

केकेआरने १० वर्षांनंतर पुन्हा (IPL final 2024) ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये ट्रॉफी जिंकली होती. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने सहज लक्ष्य गाठले.

अंतिम सामन्यात (IPL final 2024) केकेआर संघाच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर संघाच्या फलंदाजांकडून अशाच खेळाची अपेक्षा होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही ज्यात त्यांनी ११ धावांवर सुनील नारायणच्या रूपात पहिली विकेट गमावली, जो केवळ ६ धावा करत पॅट कमिन्सचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने रहमानउल्ला गुरबाजसह आक्रमक खेळी करत संघाची धावसंख्या पहिल्या ६ षटकांत १ गडी गमावून ७२ धावांवर नेली. या सामन्यात दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ९१ धावांची भागीदारी करून सामना पूर्णपणे एकतर्फी केला. गुरबाजच्या बॅटमधून ३९ धावांची खेळी पाहायला मिळाली. तर व्यंकटेश अय्यर या सामन्यात संघाला विजेतेपद मिळवून देऊन परतला ज्यात त्याने ५२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. हैदराबादसाठी या सामन्यात पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी गोलंदाजीत १-१ विकेट घेतली.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो पूर्णपणे चुकीचा ठरला, पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कने अभिषेक शर्माच्या रूपाने संघाला मोठा धक्का बसला. पहिल्या ६ षटकांचा खेळ संपेपर्यंत हैदराबाद संघाने ३ महत्त्वाचे विकेट गमावले होते. यानंतर, धावसंख्या ६२ होईपर्यंत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. येथून सामन्यात मोठी धावसंख्या करणे त्यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. सततच्या दबावामुळे केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादचा डाव केवळ ११३ धावांवर रोखला. केकेआरकडून गोलंदाजीत आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ विकेट घेतले, तर मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी २-२ विकेट्स घेतल्या, तर वैभव अरोरा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी १-१ विकेट घेतली.

हैदराबादचा एकही फलंदाज फार काळ मैदानात टिकून मोठी खेळी करू शकला नाही, त्यामुळे हैदराबादला मोठा फटका बसला. आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची ही सर्वात कमी धावसंख्या होती. स्टार्कने गोलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावत तीन षटकांत १४ धावा देऊन दोन विकेट घेतले. पण अंतिम सामन्यात पॅट कमिन्सचे नेतृत्त्व कमी पडले. केकेआरकडून उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. आंद्रे रसेलने २.३ षटकांत १९ धावांत तीन विकेट घेतले, तर हर्षित राणाने चार षटकांत एका मेडनसह २४ धावांत दोन विकेट घेतले. केकेआरने 2024 च्या हंगामात सुरुवातीपासूनच शानदार क्रिकेट खेळले आहे आणि आता अंतिम सामना एकतर्फी जिंकत त्यांनी आपल्या सर्वाेत्कृष्ट कामगिरीचा पुरावा दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.