
-
ऋजुता लुकतुके
आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. पडद्यामागे बीसीसीआयने (BCCI) या दौऱ्याची तयारी सुरू केली असून संघ निवडही मे महिन्यातच जाहीर करण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाचा उपकर्णधार असलेला जसप्रीत बुमराहकडून ही जबाबदारी काढून घेतली जाणार असल्याचं समजतंय. इंडियन एक्स्प्रेस समुहाने ही बातमी दिली आहे. खरंतर रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म बघता, त्याला वगळून कर्णधारपदच बुमराहला (Jasprit Bumrah) दिलं जाईल अशी पूर्वी चर्चा होती. पण, आता चित्र बदललं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार होता. शेवटच्या सिडनी कसोटीत त्याने तात्पुरता कर्णधार म्हणूनही काम पाहिलं. पण, निवड समिती इंग्लंड दौऱ्यावर त्याला उपकर्णधार म्हणून कायम ठेवण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात सूत्रांचा हवाला देत लिहिले आहे की, भारतीय निवड समिती बुमराहवरील गोलंदाजीचा भार कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलणार आहे. त्याला सर्वच्या सर्व पाच कसोटी खेळवलं जाणार नाही. दौऱ्या दरम्यान विश्रांती दिली जाईल. आणि पाचही कसोटीत उपलब्ध नसल्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपदही सोपवलं जाणार नाही, अशी चर्चा आहे.
(हेही वाचा – Municipal Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांना वाऱ्यावर सोडता येणार नाही; काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ?)
निवड समितीची नजर सर्व ५ कसोटी सामन्यांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर आहे आणि त्याच खेळाडूला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाईल. त्यामुळे बुमराहच्या जागी आता शुभमन गिलचा (Shubman Gill) उपकर्णधार म्हणून विचार होत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीतने भारतासाठी शानदार कामगिरी केली, तर इतर गोलंदाज तितके प्रभावी दिसले नाहीत. यादरम्यान बुमराहला पाठीची दुखापत झाली होती, ज्यामुळे तो ३ महिने क्रिकेटपासून दूर होता. चॅम्पियन्स करंडकही (Champions Trophy) तो खेळला नाही. तो जवळजवळ अर्ध्या आयपीएललाही (IPL) मुकला. गेल्या कॅलेंडर वर्षात, तो भारतीय संघाचा सगळ्यात यशस्वी तेज गोलंदाज होता.
सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना बुमराहने ७ सामन्यात १७.७२ च्या प्रभावी सरासरीने ११ बळी मिळवले आहेत. इंग्लंड दौऱ्यातही तो अशीच कामगिरी करत राहील अशी अपेक्षा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community