Ishan Kishan : इशान किशनची रणजी सामन्याला पुन्हा एकदा दांडी

शुक्रवारी झारखंडचा साखळीतील शेवटचा सामना सुरू झाला. पण, इशान तो खेळत नाहीए.

161
Ishan Kishan : अखेर इशान किशनचं स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन 
  • ऋजुता लुकतुके

इशान किशन (Ishan Kishan) शेवटच्या रणजी साखळी सामन्यापासूनही लांबच राहिला आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका तर होतेच आहे. शिवाय बीसीसीआय त्याच्यावर काही कारवाई करणार का याचीही चर्चा सुरू झाली आहे. इशान रणजी करंडक स्पर्धेत झारखंडकडून खेळतो. आणि संघाचा शेवटचा साखळी सामना राजस्थान बरोबर सुरू झाला आहे.

बीसीसीआयने वेळोवेळी खेळाडूंना स्थानिक संघाकडून रणजी करंडक खेळण्यासाठी तंबी दिलेली असताना खेळाडू विश्रांतीच्या नावाखाली देशांतर्गत स्पर्धा खेळत नाहीएत. उलट आयपीएलला प्राधान्य देताना दिसतायत. त्यामुळे अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंना रणजी सामने खेळणं सक्तीचं करण्याचं सुतोवाच केलं आहे.

इशानच नाही तर भारतीय संघातून सध्या बाहेर असलेले दीपक चहर आणि श्रेयस अय्यरही रणजीत खेळत नाहीएत. पैकी श्रेयसने पाठदुखी आणि जांघेच्या दुखापतीविषयी आधीच बीसीसीआयला कळवल्याचं समजतंय. दीपक चहर गेल्यावर्षी आयपीएलच्या हंगामात सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता. रणजी हंगामानंतर लगेचच आयपीएल सुरू होणार आहे. आणि खेळाडूंनी त्याला प्राधान्य दिलेलं बीसीसीआयला नक्कीच आवडलं नाहीए.

(हेही वाचा – Kids Electric Cars : इलेक्ट्रिक टॉय कार मुलांनी खेळाण्यामागील ५ फायदे)

राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी संघात आत बाहेर करणाऱ्या सर्व खेळाडूंना रणजी क्रिकेट खेळून सामन्यांचा सराव करण्याचे निर्देश वेळोवेळी दिले आहेत. इशान किशनलाही त्यांनी तसा जाहीर सल्ला दिला होता. पण, इशान मुंबई इंडियन्स या त्याच्या आयपीएल फ्रँचाईजीत संघ सहकाऱ्यांबरोबर सराव करताना दिसला पण, तो रणजी खेळत नाहीए.

डिसेंबर महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना इशानने मानसिक थकव्याचं कारण सांगत एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली होती. त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळलेला नाही. पण, आयपीएलसाठी सराव करताना मात्र दिसतोय. काही दिवसांपूर्वी बीसीसीआकडून इशानला शेवटचा साखळी सामना खेळण्याचे निर्देश मिळाल्याचं बोललं जात होतं. तरीही इशान गायब आहे.

त्यामुळे येत्या दिवसांमध्ये बीसीसीआय त्याच्यावर कारवाईही करू शकतं. मध्यवर्ती करारातून त्याला वगळलंही जाऊ शकतं. चांगली कामगिरी करूनही भारतीय संघात समावेश होत नसल्यामुळे इशान नाराज असल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. पण, तो सतत रणजी क्रिकेटपासून लांब राहात असल्यामुळे इथून पुढेही त्याची संधी कमी होत जाणार आहे. शिवाय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य द्यावं यासाठी बीसीसीआय आता निश्चित धोरण आणणार असल्याचं बोललं जातंय. इशान किशनपासून धडा घेऊनच बीसीसीआय त्या दिशेनं विचार करतंय.

झारखंड विरुद्ध राजस्थान रणजी सामन्यात इशान ऐवजी झारखंड संघाने आता कुमार कुशाग्रला संधी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.