IPL 2025, RCB vs PBKS : बंगळुरूच्या विजयानंतर विराटचं ‘विराट सेलिब्रेशन’ व्हायरल; श्रेयस अय्यरही वैतागला

IPL 2025, RCB vs PBKS : याच आठवड्यात बंगळुरूत झालेला सामना बंगळुरूने गमावला होता.

85
IPL 2025, RCB vs PBKS : बंगळुरूच्या विजयानंतर विराटचं ‘विराट सेलिब्रेशन’ व्हायरल; श्रेयस अय्यरही वैतागला
  • ऋजुता लुकतुके

काही वेळा विराट कोहली स्पर्धा करण्याच्या नादात रेषा ओलांडतो. रविवारी बंगळुरू विरुद्ध पंजाब सामन्यांत तेच पाहायला मिळालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाबचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला आणि यात विराटने ५४ चेंडूंत नाबाद ७३ धावा करत मोलाची भूमिका बजावली. याच आठवड्यात घरच्या मैदानावर पंजाबकडून झालेल्या पराभवाचा वचपाही अशाप्रकारे बंगळुरूने काढला. विराट ७३ धावांवर नाबाद होता. त्यामुळे विजयाची औपचारिकता झाल्यावर तो मैदानातच होता आणि विजयी धाव पूर्ण केल्यावर त्याने ज्या प्रकारे मैदानात आनंद साजरा केला, त्याबद्दल आता बोललं जात आहे. खासकरून पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे पाहून त्याने केलेले विजयी हावभाव श्रेयसलाही दुखवून गेले. (IPL 2025, RCB vs PBKS)

पंजाबने समोर ठेवलेलं १५७ धावांचं आव्हान बंगळुरूने ७ चेंडू बाकी असताना पार केलं आणि या सामन्यातून २ गुण मिळवून बंगळुरूचा संघ आता १० गुणांवर पोहोचला आहे. गुणतालिकेत बंगळुरूचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. जितेश शर्माने विजयी धाव घेतली आणि त्यानंतर विराट आपली हाताची मूठ हवेत उगारत श्रेयसच्या दिशेनं धावून गेला. त्याच्याकडे बघूनच तो हावभाव करत होता. श्रेयसला हे अजिबात आवडलं नाही हे दिसत होतं. त्याने काहीही बोलायचं टाळलं आणि तो अगदी मख्ख चेहऱ्याने विराटकडे बघत होता. सामना संपल्यानंतर दोन संघातील खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात. तेव्हाही विराट कोहली उत्साहात होता. तर श्रेयस मख्ख चेहऱ्याने उभा होता. (IPL 2025, RCB vs PBKS)

(हेही वाचा – Venkat Raghavan : तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम केलेले “वेंकट” कोण होते?)

कोहलीच्या वागण्याचा कदाचित आधीच्या सामन्यातील पराभवाची किनार होती. याच आठवड्यात दोन्ही संघ बंगळुरूमध्ये आमने सामने आले होते आणि घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बंगळुरूला पंजाबने १४ षटकांत ९ बाद ९५ वर रोखलं होतं. आणि त्यानंतर हा सामना ६ गडी राखून आरामात जिंकला होता. दोनच दिवसांत यावेळी पंजाबच्या घरच्या मैदानावर पराभवाचा वचपा काढताना विराट कोहली चांगलाच आक्रमक होता. आधीच्या सामन्यात नेहल वढेराने फटकेबाजी करून सामना पंजाबकडे खेचला होता. यावेळी नेहल धावचित झाल्यावर विराटने असंच आक्रमक सेलिब्रेशन केलं. तर पंजाबचा गोलंदाज हरप्रीत ब्रारबरोबरही तो काहीतरी बोलला. (IPL 2025, RCB vs PBKS)

विराट कोहलीबरोबरच ३५ चेंडूंत ६५ धावा करणारा देवदत्त पड्डिकलही बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १०३ धावांची भागिदारीही केली. शिवाय विराट ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बंगळुरू संघाने या स्पर्धेत आतापर्यंत ५ सामने जिंकले आहेत. यातील ४ सामने त्यांनी पाहुणे म्हणून जिंकले आहेत. तर घरच्या मैदानावर त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला आहे. (IPL 2025, RCB vs PBKS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.