IPL 2025, MI vs GT : पावसाने रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सची मुंबईवर ३ गडी राखून मात

IPL 2025, MI vs GT : बुमराह, बोल्ट यांनी ३ षटकांत ३ बळी मिळवत सामना अटीतटीचा केला होता.

75
IPL 2025, MI vs GT : पावसाने रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सची मुंबईवर ३ गडी राखून मात
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएलमध्ये खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सनी सलग सहा सामने जिंकत आपला दबदबा निर्माण केला होता. पण, या वर्चस्वाला घरच्याच मैदानावर खिंडार पाडलं ते गुजरात टायटन्सनी. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांत त्यांनी मुंबईचा ३ गडी राखून पराभव केला. पण, हा निकाल वाटतो तितका सोपा नव्हता. मध्ये पाऊस आणि जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी निर्माण केलेलं नाट्यही होतं. मुंबईला ८ बाद १५५ धावांत रोखल्यानंतर गुजरातने साई सुदर्शनच्या रुपात पहिला बळी दुसऱ्या षटकातच गमावला. पण, तोपर्यंत मुंबईत रिपरिप पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे चेंडूही चांगला स्विंग व्हायला लागला. शिवाय पावसाची भीती होती. अशावेळी बुमराह, बोल्ट आणि अश्वनीकुमार यांची गोलंदाजी खेळून काढणं कठीण आव्हान होतं. पण, ते शुभमन गिल (४६ चेंडूंत ४३) आणि जोस बटलर (२७ चेंडूंत ३०) यांनी ते बखुबी निभावलं. पुढे इम्पॅक्ट सब म्हणून आलेल्या शेमरन रुदरफोर्डने तर १५ चेंडूंत २८ धावा करत गुजरातचा विजय आटोक्यातही आणला. (IPL 2025, MI vs GT)

(हेही वाचा – Operation Sindoor : मध्यरात्री 1.30 वाजता घरात घुसून मारलं ! पहलगाम हल्ल्याला भारताचे चोख उत्तर)

पण, इतक्यात पावसाला सुरुवात झाली आणि तेराव्या षटकात एकदा आणि १८ व्या षटकात दुसऱ्यांदा पावसाचा व्यत्यय आला. या प्रत्येक व्यत्ययानंतर सामन्याचं पारडं विरुद्ध बाजूला झुकलं. पहिल्या व्यत्ययानंतर बुमराह, बोल्ट पुन्हा बुमराह आणि मग अश्वनीकुमार यांनी प्रत्येक षटकात एकेक बळी मिळवला. गुजरातची अवस्था २ बाद ११२ वरून १७.२ षटकात ६ बाद १२६ अशी करून टाकली. यावेळी गुजरातचा संघ डकवर्थ लुईसच्या गणितानुसारही मागे होता आणि दुसरा व्यत्यय आला तेव्हा गुजरातला शेवटच्या २ षटकांत जिंकण्यासाठी २४ धावा हव्या होत्या. तेव्हा मुंबईचं पारडं जड होतं. पण, पावसामुळे एक षटक कमी करावं लागलं. गुजरातसमोर शेवटच्या एका षटकात १५ धावा करण्याचं आव्हान आलं. कोत्झीए आणि राहुल तेवातिया यांनी यातील १४ धावा केल्या असताना पुन्हा एकदा कोत्झीए षटकातील पाचव्या चेंडूवर बाद झाला. पण, यावेळी शेवटच्या चेंडूवर नवीन फलंदाज अर्शद खानने एक धाव पूर्ण केली आणि गुजरातला विजय मिळवून दिला. (IPL 2025, MI vs GT)

(हेही वाचा – India-Britain FTA : भारतीय निर्यातीला शून्य शुल्काचा फायदा?, वाणिज्य मंत्रालय म्हणाले, रोजगार, निर्यात…)

या विजयासह गुजरातचा संघ आता गुणतालिकेतही १६ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या बंगळुरूपेक्षा त्यांची धावगती सरस आहे. जबाबदारीने फलंदाजी करत ४३ धावा करणारा आणि ३ झेल टिपणारा शुभमन गिल सामनावीर ठरला. त्यापूर्वी मुंबई संघाने फलंदाजीत हाराकिरी केली. रिकलटन (२) आणि रोहित (७) पहिल्या आणि दुसऱ्या षटकातच बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमार (३५) आणि विल जॅक्स (५३) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. त्यामुळे मुंबईची अवस्था ७ बाद १२३ झाला होती. पण, कॉर्बिन बॉशने २२ चेंडूंत २७ धावा करत मुंबईला निदान दीडशेचा पल्ला गाठून दिला. (IPL 2025, MI vs GT)

(हेही वाचा – Adani Foundation : ‘सेवा हेच देव आहे’, अध्यक्षा प्रीती अदानींना दुसऱ्यांदा मानद डॉक्टरेट पदवी प्रदान)

गुजरातच्या क्षेत्ररक्षकांनी काही झेल सोडले. पण, गोलंदाजांची कामगिरी अव्वल झाली. प्रत्येकच गोलंदाजाने किमान एक बळी मिळवला. मुंबई इंडियन्सला आता निर्विवाद बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. तर गुजरातने उर्वरित ३ सामन्यांपैकी एक जिंकला तरी त्यांची बाद फेरी निश्चित होईल. गुजरात, बंगळुरू, पंजाब व मुंबई हे संघ सध्या पहिले चार संघ आहेत. (IPL 2025, MI vs GT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.