-
ऋजुता लुकतुके
या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी जशी होती, त्यालाच साजेशी लढत मुंबई इंडियन्सविरुद्ध या संघाने दिली. म्हणजे पहिली जवळ जवळ १५ षटकं त्यांनी गोलंदाजी करताना भक्कम टाकली. मुंबईची अवस्था १२३ धावांवर ५ बळी अशी केली होती. पण, शेवटच्या चार षटकांत सूर्यकुमार आणि नमन धीर यांनी तब्बल ५७ धावा वसूल केल्या. यातील मुकेश आणि चमिराच्या शेवटच्या दोन षटकांतच ४० च्या वर धावा निघाल्या. तिथून दिल्ली कॅपिटल्सची जी लय बिघडली ती बिघडलीच. (IPL 2025, MI vs DC)
या हंगामात दिल्लीने पहिल्या टप्प्यात अशीच कामगिरी केली होती. पहिले १० गुण त्यांनी झटपट मिळवले. पण, नंतर संघाची जी लय बिघडली त्यामुळे साखळीतच गारद होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मुंबईने त्यांचा ५९ धावांनी पराभव करत दिमाखात बाद फेरी गाठली आहे. तर दिल्लीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. सूर्यकुमार (नाबाद ७३) आणि नमन धीर (नाबाद २४) यांनी शेवटच्या षटकांत केलेली हाणामारी आणि प्रत्येकच गोलंदाजाने केलेली अचूक गोलंदाजी हे मुंबईच्या डावाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. (IPL 2025, MI vs DC)
(हेही वाचा – Capital Jewish Museum : अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची गोळीबारात हत्या)
The quest for Title No. 6⃣ is alive 🏆
Congratulations to @mipaltan who become the fourth and final team into the #TATAIPL 2025 playoffs 💙 👏#MIvDC pic.twitter.com/gAbUhbJ8Ep
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2025
मुंबईत पावसाची शक्यता असल्यामुळे आणि खेळपट्टी दोन दिवस झाकलेली असल्यामुळे इथे धावा कमी होतील असा अंदाज होता. अशावेळी आजारी अक्षर पटेलच्या जागी कप्तानी करणाऱ्या फाफ दू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पहिली १६.३ षटकं तरी या निर्णयाला गोलंदाजांनी साथ दिली आणि मुंबईची अवस्था ५ बाद १२३ अशी केली होती. रोहित (६), रिकलटन (२५), विल जॅक्स (२१) आणि हार्दिक पांड्या (१) झटपट बाद झाले. पण, तिथून पुढे वानखेडे स्टेडिअमवर सूर्या आणि नमन यांचा खेळ रंगला. मुंबईने ५ बाद १८० अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. दिल्लीकडून मुकेश कुमारने २ बळी मिळवले. पण, त्यासाठी त्याला ४८ धावा मोजाव्या लागल्या. तर चमिराच्या ४ षटकांत तर ५४ धावा मुंबईकरांनी लुटल्या. (IPL 2025, MI vs DC)
आणि १८० धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातच अडखळती झाली. दुसऱ्याच षटकात फाफ दू प्लेसिसला चहरने बाद केलं. त्या नंतरच्या षटकात अनुभवी के. एल. राहुल बाद झाला. तिथून दिल्लीची गाडी रुळावरून घसरली ती सावरलीच नाही. शिवाय मुंबईच्या चहर, बोल्ट, बुमराह आणि सँटनर या सगळ्याच गोलंदाजांनी अगदी अचूक आणि जखडून टाकणारी गोलंदाजी केली. सँटनरने ४ षटकांत फक्त ११ धावा देत ३ बळी मिळवले. तर बुमराहनेही ३ गडी बाद केले. त्यामुळे १९ व्या षटकांत दिल्लीचा डाव १२१ धावांत आटोपला. (IPL 2025, MI vs DC)
(हेही वाचा – Salman Khan च्या बंगल्यात घुसला अनोळखी व्यक्ती)
मुंबई इंडियन्सनी हंगामात खराब सुरुवातीनंतर सलग ५ सामने जिंकून या लीगमध्ये पुनरागमन केलं. मध्ये गुजरातविरुद्धचा अपवाद वगळला तर सुरेख खेळाचं प्रदर्शन केलं आहे. याउलट दिल्लीने सुरुवातीला ४ विजय मिळवले आणि त्यानंतर त्यांना सातत्य राखता आलं नाही. आयपीएलचे बाद फेरीतील चार संघ आता ठरले असून गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी बाद फेरी गाठली आहे. (IPL 2025, MI vs DC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community