-
ऋजुता लुकतुके
चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा ९ पैकी दोनच सामने जिंकू शकला आहे आणि ४ गुणांसह हा संघ गुण तालिकेत तळाला आहे. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडचा हात दुखावल्यावर संघाचं नेतृत्व अनुभवी महेंद्रसिंग धोनीकडे आलं. पण, त्यामुळे निकालांमध्ये आणि खेळाडूंच्या विजिगिषू वृत्तीत काहीही फरक पडलेला दिसत नाही. चेन्नईचा संघ बाद फेरी गाठणं हे फक्त कागदी आकडेवारीमध्ये शक्य आहे. बाकी मैदानावर तशी चिन्ह दिसत नाहीत, अशी आता परिस्थिती आहे. त्यामुळे संघाचे ४ सामने अजूनही बाकी असतानाच चेन्नई ड्रेसिंग रुममध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. संघात घाऊक बदल आणि मुख्य म्हणजे थाला महेंद्रसिंग धोनी याच्या भवितव्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. (IPL 2025, M S Dhoni)
चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैनाने या हंगामातील निराशाजनक कामगिरीविषयी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्या मते, नवीन हंगामाचं नियोजन खेळाडूंच्या लिलावातच सुरू झालं पाहिजे. महेंद्रसिंग धोनीपुढील हंगाम खेळणार असल्यामुळे त्याला केंद्रस्थानी धरुनच नियोजन झालं पाहिजे. एका युट्यूब पॉडकास्टमध्ये बोलताना रैनाने लोकांच्या मनातील दोन प्रश्नांचीच थेट उत्तरं दिलं आहेत. (IPL 2025, M S Dhoni)
(हेही वाचा – मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा कॉंग्रेसच्या नेत्यावर पलटवार; म्हणाले, ‘जखमेवर मीठ चोळायची कामे करू नका’)
‘फ्रँचाईजीचं म्हणणं असतं की, लिलावातील खेळाडू धोनी ठरवतो. कोणत्या खेळाडूंना कायम राखलं हे धोनीला ठाऊक होतं. पण, लिलावातील खरेदीची माहिती धोणीला नव्हती आणि खरंतर ती असायला हवी. कारण, लिलावातच सगळं चुकलं आहे. धोनीला कदाचित त्यांनी खेळाडू विकत घेताना काही मिनिटं आधी विचारलं असेल. पण, निर्णय त्याला विचारून घेतलेला नाही, हे मी सांगू शकतो. मला तर कधीच लिलाव संपेपर्यंत खेळाडूंची नावं कळलेली नाहीत. ती धोनीलाही माहीत नसावीत,’ असा थेट आरोपच रैनाने केला आहे. (IPL 2025, M S Dhoni)
कोणत्या खेळाडूंमध्ये गुंतवणूक करायची हे ठरवताना धोनीचा सल्ला घेतला तर ते चांगलं ठरेल, असं रैनाने स्पष्टपणे म्हटलं आहे. महेंद्रसिंग धोनीने या हंगामात हवी तशी कामगिरी केलेली नाही. त्याबद्दलही रैनाने आपलं मत मांडलं. ‘४३ व्या वर्षी धोनी संघासाठी जे प्रयत्न करतोय, ते अजोड आहे. तो २० षटकं यष्टीरक्षण करतोय, संघाचं नेतृत्व करतोय आणि जमेल तसं बॅटनेही योगदान देतोय. आता इतर दहा खेळाडूंनीही थोडा जास्त प्रयत्न करावा,’ असं मत रैनाने व्यक्त केलं. ‘धोनी आता त्याचं नाव, संघाची गरज, चाहत्यांची मागणी आणि ब्रँडसाठी खेळतोय. तरीही तो संघासाठी प्रयत्न करतोच आहे. आता ज्यांना १८,१२ आणि १७ कोटी रुपये मिळालेत, त्यांनी थोडंतरी योगदान द्यावं,’ असं रैना शेवटी म्हणाला. चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. (IPL 2025, M S Dhoni)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community