IPL 2025, Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला अजूनही भारतीय संघात स्थान मिळवण्याची आस

IPL 2025, Ajinkya Rahane : ‘मला पुन्हा एकदा भारतीय जर्सी घालायची आहे,’ असं रहाणे म्हणाला आहे.

33
IPL 2025, Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला अजूनही भारतीय संघात स्थान मिळवण्याची आस
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं भारतीय संघात पुनरागमन करण्याचं आपलं स्वप्न आणि इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. ‘पुन्हा भारतीय जर्सी अंगावर घालता यावी यासाठी माझ्यातील भूक आणि ईर्ष्या अजून कायम आहे,’ असं रहाणेनं बोलून दाखवलं आहे. २०२३ मध्ये रहाणे भारतीय संघासाठी आपली शेवटची कसोटी खेळला. पण, त्यापूर्वी साधारण १० वर्षं तो नियमितपणे कसोटी संघाचा भाग राहिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून देताना फलंदाजी आणि नेतृत्वातही त्याने आपली कमाल दाखवून दिली होती. सध्या अजिंक्य आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध संघाने एका धावेनं निसटता विजय मिळवला असला तरी त्यामुळे संघाचं स्पर्धेतील आव्हान कायम राखलं गेलं आहे. पुढील आव्हानही कठीणच असणार आहे. याची कल्पनाही रहाणेला आहे. (IPL 2025, Ajinkya Rahane)

(हेही वाचा – IPL 2025, Longest Sixes : यंदाच्या आयपीएलमधील सर्वात लांब षटकार कुणाचा?)

‘मी माझ्या जबाबदारीचं भान ठेवून आहे. पण, भारतीय संघात पुनरागमन करण्याची माझी इच्छा आहे. ती भूक, ती आग माझ्यात अजून आहे. शिवाय मी तंदुरुस्तही आहे. पण, एकावेळी मी एकच गोष्ट बघतो. सध्या मी आयपीएलवर लक्ष केंद्रीत केलं आहे आणि त्यानंतर पुडे काय होईल ते पाहू,’ असंही रहाणे स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या प्रेसरुम कार्यक्रमात बोलताना म्हणाला. ‘मी मैदानावरील कामगिरीवर जास्त लक्ष देणारा खेळाडू आहे. मी कामगिरी करत राहतो. मैदानावर १०० टक्के किंवा त्याहून जास्त देण्यावर माझा भर असतो. या गोष्टी माझ्या हातात आहेत. मी देशांतर्गत क्रिकेटही खेळतो आणि हे सगळं अनुभवताना मी खुश आहे,’ असंही रहाणे यावेळी म्हणाला. (IPL 2025, Ajinkya Rahane)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : तुर्कस्तानवर आर्थिक बहिष्कार घाला; ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे कळकळीचे आवाहन)

अजिंक्य रहाणेच्या कारकीर्दीतला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता तो २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा. विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला असताना त्याने संघाचं नेतृत्व केलं. भारताला ऑस्ट्रेलियात २-१ असा मालिका विजय मिळवून दिला. मेलबर्न कसोटीत स्वत; रहाणेनं दुसऱ्या डावांत १०५ धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेनं भारतासाठी ५,००० च्या वर धावा केल्या आहेत. ‘मी खेळावर आणि तंदुरुस्तीवर मेहनत घेतो. हंगाम सुरू होण्यापूर्वीच्या सुटीत मी २-३ सत्रांमध्ये सराव करतो. तंदुरुस्ती आणि आहारावर मेहनत घेतो. हे सगळं मी क्रिकेटसाठी करतो आहे. कधीतरी पुन्हा एकदा भारताकडून खेळण्याची संधी मला मिळेल, असं मला वाटतं आणि माझी उद्दिष्ट मी नीट आखून घेतो. त्यानुसार प्रयत्न करतो. सध्या आयपीएल स्पर्धेवर मी लक्ष केंद्रीत केलं आहे,’ असं अजिंक्यने बोलून दाखवलं. कोलकाता संघ गतविजेता असला तरी यंदा संघाची कामगिरी उतार चढावांनी भरलेली आहे. ११ सामन्यांत ५ विजय आणि ५ पराभवांसह त्यांनी ११ गुण मिळवले आहेत. बाद फेरीत प्रवेशासाठी उर्वरित दोन सामने जिंकण्याबरोबरच त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे. (IPL 2025, Ajinkya Rahane)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.