ICC on Afghanistan : अफगाणिस्तानच्या क्रिकेट विश्वचषकातील सहभागावर आयओसी निर्णय घेईल

158
  • ऋजुता लुकतुके

२०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आलाय. पण, अफगाणिस्तान (Afghanistan) संघ खेळेल की नाही, याचा निर्णय मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेचा असेल, असं आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ॲलरडाईस यांनी स्पष्ट केलं आहे.

आयसीसीची यात काही भूमिका नसेल. ऑलिम्पिक परिषद आणि लॉस एंजलिस ऑलिम्पिकची आयोजन समिती यांचा निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागेल, असं ॲलरडाईस म्हणाले. ‘ऑलिम्पिकमध्ये त्या त्या देशाची राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना आपले संघ उतरवते. अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यापासून तिथली राष्ट्रीय संघटना बरखास्त आहे. त्यामुळे अशावेळी नेमकं काय करायचं, यात आयसीसी कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही. हा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदच घेईल,’ असं ॲलरडाईस यांनी बीबीसीच्या पॉडकास्टमध्ये स्पष्ट केलं.

(हेही वाचा SA vs Afg : पंचांच्या निर्णयाविरुद्ध अपील करत जेव्हा अफगाणिस्तान संघाने डी कॉक विरोधात पायचीतचा निर्णय मिळवला)

ऑलिम्पिक परिषद अफगाणिस्तान (Afghanistan)मधील अंतर्गत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं. आणि क्रिकेट परिषदेचा सदस्य देश म्हणून आयसीसी अफगाणिस्तानला सहकार्य करायलाही तयार आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं यंदा लिंगसमानतेला महत्त्व दिलं आहे. पण, अफगाणिस्तानमध्ये महिलांचा क्रिकेट संघ अस्तित्वात नाही. ही गोष्टही त्यांच्या विरोधात जाऊ शकते.

‘२०१७ मध्ये आयसीसीने अफगाणिस्तानात (Afghanistan) महिलांचं क्रिकेट सुरू करण्याचे प्रयत्न केले. पण, राजकीय परिस्थिती बदलल्यावर पुन्हा सगळं बदललं. आताही आयसीसीचा अफगाणिस्तानला पाठिंबाच आहे. आणि २०२१ पासून पुन्हा आयसीसीने महिलांच्या क्रिकेटची मागणी लावून धरली आहे,’ असं ॲलरडाईस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.