-
ऋजुता लुकतुके
नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. रोहित, विराटशिवाय भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा असल्यामुळे खासकरून विराटची जागा कोण घेणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशावेळी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने या दौऱ्यावर भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ कसा असेल आणि चौथ्या क्रमांकावर त्याची पसंती कुणाला आहे याचे काही संकेत दिले आहेत. (India Tour of England)
‘देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर कुणी भरपूर धावा केल्या असतील, तर त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल. अशा खेळाडूला किमान ३-४ कसोटींमध्ये संधी मिळाली पाहिजे. करुण नायरमुळे रणजी सामने नियमितपणे खेळण्याचं महत्त्व अधोरेखित होतं,’ असं गंभीर म्हणाला आहे. करुणचा इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभवही संघाला उपयोगी पडेल असं त्याने आवर्जून बोलून दाखवलं. (India Tour of England)
(हेही वाचा – Railway Accident : प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर; धावत्या ट्रेनमधून पडून एकाने गमावला हात)
करुण नायरसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा प्रवास हा वळणा वळणांचा आणि खाचखळग्यांचा ठरला आहे. २०१६ च्या इंग्लंड दौऱ्यात त्याने ३०३ धावा करत त्रिशतक झळकावलं होतं. पण, काही महिन्यातच कामगिरीतील सातत्य ढासळल्यामुळे तो निवड समितीच्या नजरेतून उतरला. लागोपाठच्या दोन दौऱ्यांवर त्याची कामगिरी चांगली झाली नाही आणि तेव्हापासून भारतीय संघातून तो बाहेर फेकला गेला. २०२३ मध्ये तो इंग्लंडमध्ये काऊंटी हंगाम खेळला आणि त्यानंतर २०२३-२४ आणि २०२४-२५ चा रणजी हंगाम त्याने गाजवला. गेल्यावर्षी रणजीत तर त्याने ८६३ धावा केल्या. अलीकडेच भारतीय ए संघातून खेळतानाही त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध द्विशतक केलं आहे. (India Tour of England)
त्यामुळे भारतीय संघाचे दरवाजे त्याने फक्त ठोठावले नाहीत, तर दार उखडून तो आत आला आहे. मानसिक कणखरता, तंत्रकुशलता आणि पुनरागमनाची आस यामुळे संघातील चौथ्या क्रमांकासाठी तो मुख्य दावेदार असेल. गंभीरने दौऱ्यापूर्वी त्याचं जाहीर कौतुक केल्यामुळे अंतिम अकरामधील त्याची जागाही निश्चित मानली जात आहे. (India Tour of England)
(हेही वाचा – Russia-Ukraine War : रशियाचे युक्रेनवर ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ले; ४ जण ठार)
भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्यातील कार्यक्रम
हेडिंग्ले कसोटी – २० ते २४ जून
एजबॅस्टन कसोटी – २ ते ६ जुलै
लॉर्ड्स कसोटी – १० ते १४ जुलै
ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी – २३ ते २७ जुलै
ओव्हल कसोटी – ३१ जुलै ते ४ ऑगस्ट
हेही पहा –
Join Our WhatsApp Community