-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची जोरदार तयारी करत आहे. २० जूनला हेडिंग्ले इथं पहिला कसोटी सामना रंगणार आहे. त्यापूर्वी लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघ सराव करत आहे. मैदानावरील नेट्समध्ये खेळाडूंनी फलंदाजीचा जोरदार सराव केला. बीसीसीआयने त्याची क्षणचित्र ट्विटरवर शेअर केली आहेत. मागचे दोन दिवस संघाचा इनडोअर सराव सुरू होता. आता खेळाडूंनी बेकेनहेम इथं असलेल्या नेट्समध्ये प्रत्यक्ष सरावाला सुरुवात केली आहे. (India Tour of England)
फलंदाजीत शुभमन गिल, रिषभ पंत यांच्या बरोबरीने जसप्रीत बुमराहही पॅड्स बांधून सराव करताना दिसला. तसंच त्याने गोलंदाजीचाही सराव केला. गिल आणि पंत यांनी थ्रोडाऊन चेंडूंवर फलंदाजीचं तंत्र घोटवलं आणि इंग्लंडमधील खेळपट्ट्यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. तर बुमराह आणि सिराज एकत्र गोलंदाजीचा सराव करताना दिसले. जडेजाही फलंदाजी बरोबरच गोलंदाजीच्या नेट्समध्येही दिसला. एका सत्रात खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाचा सराव केला. (India Tour of England)
(हेही वाचा – कायद्याचे उल्लंघन सहन करणार नाही; America ने का दिले स्पष्टीकरण ?)
Vibes. Form. Focus 🔥#TeamIndia in full prep mode at Beckenham 💙 #ENGvIND pic.twitter.com/kBkDiGetmp
— BCCI (@BCCI) June 9, 2025
सलग दोन दिवसांच्या सरावानंतर भारतीय संघासाठी बुधवारचा दिवस हा विश्रांतीचा असेल. मग सरावाच्या पुढील सत्रांना सुरुवात होईल. भारतीय संघ पहिल्या कसोटीपूर्वी संघातील खेळाडूंचे दोन गट पाडून सराव सामनाही खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकन संघांदरम्यान कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत पार पडल्यानंतर नवीन अजिंक्यपद चक्राची सुरुवात भारत – इंग्लंड मालिकेपासूनच होणार आहे. (India Tour of England)
भारतासाठी ही मालिका विशेष महत्त्वाची आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ पहिल्यांदा त्यांच्या शिवाय मैदानात उतरणार आहे. नवीन कर्णधार शुभमन गिलसाठी हा कसोटीचा क्षण असणार आहे. दोघांच्या अनुपस्थितीत संघाची आघाडीची आणि मधली फळीही नव्याने बसवावी लागणार आहे. या मालिकेतील ५ कसोटी सामने अनुक्रमे हेडिंग्ले, साऊदॅम्पटन, लॉर्ड्स, ओव्हल आणि मँचेस्टर इथं होणार आहेत. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community