-
ऋजुता लुकतुके
भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांच्या बोलण्यावरून तरी पहिल्या हेडिंग्ले कसोटीत नितीश कुमार रेड्डीचं पक्कं असल्याचे संकेत मिळत आहेत. दररोज होणाऱ्या पत्रकार परिषदेत बुधवारी रात्री मॉर्केल यांनी नितीश रेड्डीची जोरदार पाठराखण केली. ‘नितीशने जास्त काळ गोलंदाजी करावी यासाठी आम्ही त्याला प्रोत्साहन देत आहोत,’ असं मॉर्केल म्हणाले. ‘नितीशकडे जादूई चेंडू आहेत,’ असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. (India Tour of England)
नितीश कुमार हा अष्टपैलू खेळाडू म्हणून तळाला फलंदाजी करू शकतो. ऑस्ट्रेलियात बॉक्सिंग डे कसोटीत त्याने शतकही झळकावलं होतं. मेलबर्नमधील शतक आणि नुकत्याच झालेल्या इंग्लंड लायन्स विरुद्धच्या सामन्यातील कामगिरी यामुळे नितीश कुमारवर संघ प्रशासनाचा भरवसा दिसत आहे. कारण, एरवी अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याची शार्दूल ठाकूरशी स्पर्धा आहे. पण, इंग्लंड लायन्स विरुद्ध नितीशने २६ षटकंही टाकली आहेत. ते पाहता, मॉर्केलने त्याला गोलंदाजीचा भार वाढवण्याचं आव्हान दिलं आहे. (India Tour of England)
(हेही वाचा – America : ग्लोबल टेरिफचा निर्णय लागू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाची मोकळीक; ट्रम्प यांचे मोठे यश)
‘नितीशकडे कौशल्य आहे. तो असा खेळाडू आहे जो पाचवा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताना जादूई चेंडू टाकू शकतो. त्यासाठी त्याला सातत्याने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीत सातत्य आणावं लागेल. यावर नितीशने काम करावं,’ असं मॉर्केल म्हणाले. मॉर्केल सातत्याने नितीश कुमारशी बोलत असल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. खासकरून इंग्लंडमधल्या वातावरणात चांगला पाचवा गोलंदाज संघात असणं महत्त्वाचं आहे. ती जबाबदारी नितीश रेड्डी पार पाडू शकतो, असं संघ प्रशासनाला वाटतं. (India Tour of England)
शार्दूल आणि नितीशपैकी कुणाला संघात संधी मिळणार हा थेट प्रश्न मात्र मॉर्केल यांनी टाळला. ‘सध्या कसोटीसाठी तयार होणं जास्त महत्त्वाचं आहे. संघाचं विचाराल तर समतोल महत्त्वाचा ठरणार आहे. फलंदाजीत तो समतोल आहे. आता गोलंदाजीत प्रतिस्पर्धी संघ दोनदा बाद करणारे गोलंदाज संघात हवेत. तोच विचार संघ निवडीत होईल,’ असं मॉर्केल म्हणाला. भारत आणि इंग्लंडदरम्यानचा पहिला कसोटी सामना २० जूनला लीड्स इथं होणार आहे. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community