ICC ODI World Cup : अक्षर पटेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही, अश्विनला विश्वचषकाची संधी

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फिरकी गोलंदाज अक्षर पटेल खेळू शकणार नाही. त्यामुळे रवीचंद्रन अश्विनचे हौसले बुलंद झाले आहेत. कारण, या मालिकेबरोबरच आगामी एकदिवसीय विश्वचषकातही त्याचा विचार आता होऊ शकतो.

88
ICC ODI World Cup : अक्षर पटेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही, अश्विनला विश्वचषकाची संधी
ICC ODI World Cup : अक्षर पटेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही, अश्विनला विश्वचषकाची संधी

 ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एक महत्त्वाची अंतर्गत घडामोड सुरू आहे. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या मांडीचा स्नायू दुखावला आहे. आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ICC ODI World Cup) तो खेळू शकणार नाही हे स्पष्ट आहे. पण, त्याचबरोबर आगामी विश्वचषक स्पर्धेतही त्यामुळे त्याच्या ऐवजी रवीचंद्रन अश्विनचा विचार होऊ शकतो, अशी चिन्हं आहेत.

अक्षर सध्या बंगळुरूमध्ये नॅशनल क्रिकेट अकॅडमीत दुखऱ्या पायावर उपचार घेतोय. २७ सप्टेंबरला राजकोट इथं होणारा एकदिवसीय सामना तो खेळणार नाही हे नक्की आहे. पण, त्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ निश्चित करायचा आहे. आणि अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह असेल तर सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या अश्विनचा विचार होऊ शकतो.

अश्विन दीड वर्षांनंतर भारतीय एकदिवसीय संघात (ICC ODI World Cup) खेळतोय. पण, ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये चार बळी मिळवले आहेत. यात इंदूरमधील सामन्यात ४१ धावांमध्ये ४ बळी टिपत त्याने ऑस्ट्रेलियाची मधली फळी गारद केली होती. त्याची धावगतीही षटकामागे ५ धावा इतकी चांगली आहे (दोन्ही सामन्यांत संघांनी धावा लुटल्या आहेत). शिवाय या घडीला अश्विन भारताचा सगळ्यात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळे निवड समिती आता काय निर्णय घेते याविषयी उत्सुकता आधीच निर्माण झाली आहे.

अर्थात, अक्षरच्या दुखापतीचं स्वरुप अजून पूर्णपणे कळलेलं नाही. तसंच विश्वचषका आधीच्या सराव सामन्यांसाठी तो उपलब्ध होऊ शकेल असंही बोललं जात आहे. पण, तरीही विश्वचषकाच्या संघ निवडीसाठीही अजित आगरकर यांच्या निवड समितीसमोर अक्षर आणि अश्विन असे दोन पर्याय आहेत हे नक्की.

राजकोट सामन्यात कोण खेळणार, कुणाला विश्रांती?

एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ ताजातवाना राहावा यासाठी सध्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंना टप्प्याटप्प्याने विश्रांती देण्यात येत आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहीत शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा खेळले नाहीत.

(हेही वाचा-Pankaja Munde : वैद्यनाथ साखर कारखाना GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…)

पण, राजकोटमधील सामन्यासाठी तिघंही संघात परततील. तर शुभमन गिल आणि शार्दूल ठाकूर यांना आता विश्रांती देण्यात येईल. दोघंही इंदूरमधून राजकोटला गेलेले नाहीत.

राजकोट मधील एकदिवसीय सामना (ICC ODI World Cup) हा भारत तसंच ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषका पूर्वीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्यानंतर दोन्ही संघ विश्वचषकात ८ ऑक्टोबरला आमने सामने येतील. ही लढत चेन्नईत होणार आहे. तर आताच्या संघाचा भाग असलेले ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार हे दोन खेळाडू भारताच्या आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या संघाचा भाग आहेत. ते देखील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित सामन्यासाठी उपस्थित नसतील. ऋतुराज आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या संघाचा कर्णधार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.