-
ऋजुता लुकतुके
भारतीय राष्ट्रीय संघात खेळाडू हे स्टार असतात आणि स्टार खेळाडू बहुतांशवेळा कर्णधार होतो. तो पुढे देशाचा आयकॉनही होतो. अशा अनौपचारिक व्यवस्थेत कर्णधार हाच संघाचा राजा असतो. तिथे मुख्य प्रशिक्षक आणि अनेकदा बीसीसीआयचंही काही चालत नाही. २००० च्या दशकात सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांना संघातील स्टार संस्कृती काढून टाकायची होती. पण, स्टार खेळाडूच काय इतरांनीही त्याला प्रतिसाद दिला नाही. अखेर मुदतीपूर्वीच ते बाहेर पडले. (Gautam Gambhir the King)
त्यानंतरच्या काळात न्यूझीलंडचे जॉन राईट असोत, आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन किंवा भारताचा रवी शास्री यांनी या संस्कृतीशी जुळवून घेतलं आणि ते संघाबरोबर ४ वर्षांपेक्षा जास्त काळ राहिले. राहुल द्रविडनेही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी जुळवून घेऊन संघात शिस्त आणली. आता कसोटी संघात रोहीत आणि विराट पर्वाचा अंत झाला आहे. कसोटी संघातून एक मोठं स्थिंत्यंतर झालं आहे. त्यातून एक गोष्ट समोर येतेय ती म्हणजे इथून पुढे निदान काही काळ गौतम गंभीरकडे भारतीय संघाची अनभिषिक्त धुरा असेल. (Gautam Gambhir the King)
(हेही वाचा – Pakistan: ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकड्यांचे ३५ जवान ठार; पण मुल्ला मुनीरची कातडी बचाव प्रतिक्रिया; म्हणतो…)
बीसीसीआयमधील सूत्र वारंवार मीडियाला हेच सांगत होते की, भारतीय संघातील स्टार संस्कृती गंभीरला नाहीशी करायची आहे. दोन वर्षं संघाची धुरा आपल्याकडे द्या, अशी विनंती गंभीर बीसीसीआयला करत होता आणि ती वेळ आता बीसीसीआयने त्याला दिली आहे, असंच अलीकडच्या घडामोडीतून दिसतंय. ‘इंग्लंड दौऱ्यापासून नवीन अजिंक्यपद चक्र सुरू होतंय. त्यासाठी संघात नवीन दमाचे खेळाडू हवेत, अशी गंभीरची मागणी होती,’ असं पीटीआयला बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं आहे. (Gautam Gambhir the King)
यापूर्वी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि पूर्वी सौरव गांगुली यांची उदाहरणं बघितली तर भारतीय क्रिकेटवर कर्णधारांचं प्रभुत्व होतं. पण, आता नवीन कर्णधार शुभमन गिल किंवा रिषभ पंत असेल आणि ते अजूनही स्टार खेळाडू बनलेले नाहीत. अशावेळी संघावर गंभीरचंच प्रभुत्व असेल असं स्पष्टपणे दिसतंय आणि गंभीरसाठी ही दुधारी तलवारही असणार आहे. कारण, बीसीसीआयने मनासारखे अधिकार दिले असताना कामगिरी करून दाखवण्याची जबाबदारी आता त्याच्यावर असेल आणि घोडामैदान जवळ आहे. भारताचा इंग्लंड दौरा ही त्याची पहिली परीक्षा असणार आहे. (Gautam Gambhir the King)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community