Neymar Al Hilal Deal : सौदी क्लबने नेमारला दिलं २५ बेडरुमचं घर आणि खाजगी वापरासाठी जेट

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने केला सौदी अरेबियातील फुटबॉल क्लब अल हिलालशी करार

120
Neymar Al Hilal Deal : सौदी क्लबने नेमारला दिलं २५ बेडरुमचं घर आणि खाजगी वापरासाठी जेट
Neymar Al Hilal Deal : सौदी क्लबने नेमारला दिलं २५ बेडरुमचं घर आणि खाजगी वापरासाठी जेट
  • ऋजुता लुकतुके

सौदी अरेबियामध्ये फुटबॉल खेळताना नेमारची जीवनशैली सौदी राजपुत्रापेक्षा काही कमी नसणार आहे. कारण, घसघशीत मोबदल्याबरोबरच नेमारला मिळणार आहे २५ बेडरुमचं घर आणि खाजगी वापरासाठी जेट विमान. ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने सौदी अरेबियातील फुटबॉल क्लब अल हिलालशी करार केला आहे. आणि दोन वर्षांच्या या करारासाठी त्याला ९० दशलक्ष युरोज इतकी घसघशीत रक्कमही मिळणार आहे. पण, या रकमेबरोबरच त्याला मिळणारे भत्ते ऐकलेत तर तुमचे डोळे विस्फारतील. त्याच्या २५ बेडरुम असलेल्या व्हिलाबाहेर उभ्या असतील जगातील सर्वोत्तम गाड्यांचा ताफा. त्यांच तिथलं आयुष्यच एखाद्या सौदी राजपुत्रापेक्षा कमी असणार नाही.

त्याच्या खाजगी वापरासाठी त्याला जेट देण्यात येणार आहे. तर त्याचा मुक्काम असेल २५ खोल्यांच्या एका राजवाड्यासारख्या मॅन्शनमध्ये. या घरात ४० x १० मीटरचा जलतरण तलाव असेल. तीन सौना बाथरुम असतील. आणि नेमारच्या दिमतीला चोवीस तास राबणारे पाच नोकर असतील. शिवाय नेमारच्या गॅरेजमध्ये बेंटली, ॲस्टन मार्टिन आणि लँबॉर्गिनी या गाड्‌या तैनात असतील. आणि त्या चालवण्यासाठी २४ तास ड्रायव्हरची सोय असेल. या दोन वर्षातील नेमारची हॉटेलची सर्व बिलं अल हिलाल क्लबच भरेल. इतर सेवांचे पैसेही त्याला चुकते करण्यात येतील.

(हेही वाचा – Chandrayaan-3 चे विक्रम लँडर चंद्राजवळ पोहचले)

सुपरस्टार नेमारला सोशल मीडियावर त्याने सौदी अरेबियाबद्दल केलेल्या प्रत्येक पोस्टसाठी ५ लाख युरोज मिळणार आहेत. अल हिलाल बरोबरच्या करारात नेमारची जोडीदार बियानर्डी बरोबर राहण्याची परवानगीही त्याला देण्यात आली आहे. कारण, सौदी अरेबियामध्ये लग्नाशिवाय असं एकत्र राहणं हा गुन्हा आहे. यापूर्वी रोनाल्डोलाही अल नासर क्लबने तशी परवानगी दिली होती. इतकंच नाही तर अल हिलाल जितके सामने जिंकले, त्या प्रत्येक सामन्यासाठी नेमारला ८०,००० युरोजचा बोनस देण्यात येईल. हे सगळे भत्ते आणि पैसे मोजले तर नेमार दोन वर्षांच्या सौदी अरेबियातील वास्तव्यात ३०० दशलक्ष युरोजच्या वर कमाई करणार आहे. सौदी अरेबियात फुटबॉलची प्रसिद्धी वाढावी यासाठी तिथले राजपुत्र खास प्रयत्न करत आहेत. आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे तो क्लब फुटबॉलला चालना देण्याचा. जगातले सर्वोत्तम फुटबॉलपटू सौदीमध्ये खेळावेत यासाठी क्लब आणि खेळाडूंना सवलतीही मिळतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.